Friday 29 September 2023

News Analysed, Opinions Expressed

CLEAR CUT

मराठी साहित्य महामंडळ, की ‘काळोखाचे पुजारी’?

 

उदगीरमधील मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून प्राचार्य कौतिकराव ढाले पाटील जेव्हा हे वक्तव्य करतात तेव्हा ते व्यक्तिगत मत म्हणून डावलता येत नाही. कारण ते महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनच बोलत नव्हते तर साहित्य संमेलनाचे यजमान म्हणून बोलत होते. तेव्हा त्यांचे मत हे महामंडळाचेच नव्हे तर संपूर्ण साहित्य संमेलनाचे मत बनते.



1964 मध्ये गोव्यातील मडगाव शहरात 45वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानपीठकार मराठी साहित्यिक वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कोंकणीचा भाषा म्हणून पुरस्कार करणाऱ्या व गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण करण्यास विरोध करणाऱ्या गोमंतकीयांना उद्देशून ते ‘काळोखाचे पुजारी’ आहेत असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा मंडपातच उभे राहून निषेध करणाऱ्या युवकांमधले एक होते आजचे ज्ञानपीठकार कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो. या वर्षी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात संपन्न झालेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते प्रमुख पाहुणे होते. सुमारे 60 वर्षांच्या या काळात व त्यानंतरच्या पन्नासाव्या मराठी संमेलनापर्यंत कोंकणी भाषेने एक स्वतंत्र साहित्यिक भाषा म्हणून किती मजल मारलीय त्याचे हे सर्वोत्कृष्ट प्रतिबिंब. 

1967 मध्ये झालेल्या जनमत कौलातून गोमंतकीयांनी विलिनीकरण नाकारले. 1975 पासून 1992 पर्यंतच्या काळात साहित्य अकादमीने कोंकणीला दिलेला भाषेचा दर्जा, 1987 मध्ये दिलेला गोव्याच्या राज्यभाषेचा दर्जा व 1992 मध्ये राष्ट्रभाषा म्हणून भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात दिलेले स्थान यातच सर्व काही आले. कोंकणीला मिळालेले हे दुसरे ज्ञानपीठ. त्याशिवाय एक सरस्वती सन्मान, पद्म पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा कोंकणी सिनेमांनी पटकावलेले कित्येक प्रतिष्ठेचे पुरस्कार ही सर्व कोंकणी भाषेच्या साहित्यिक दर्जाची जितिजागती द्योतके आहेत. तरीसुद्धा कोणी अजूनही कोंकणी ही मराठीची बोलीच आहे असे आग्रही प्रतिपादन करीत असेल तर आदरणीय कुसुमाग्रजांच्या भाषेतच, परंतु खेदाने, म्हणावे लागेलः “हे काळोखाचे पुजारी आहेत.”

ही महामंडळाची भुमिका आहे का?

आता अशी वक्तव्ये एखाददुसऱ्या व्यक्तीने केली असती तर त्याची दखल घेण्याची अजिबात गरज नव्हती. आणि तशी वक्तव्ये आजतागायत चालूच आहेत. परंतु उदगीरमधील मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील जेव्हा हे वक्तव्य करतात तेव्हा ते व्यक्तिगत मत म्हणून डावलता येत नाही. कारण ते महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनच बोलत नव्हते तर साहित्य संमेलनाचे यजमान म्हणून बोलत होते. तेव्हा त्यांचे मत हे महामंडळाचेच नव्हे तर संपूर्ण साहित्य संमेलनाचे मत बनते. 

त्याहूनही खेदजनक म्हणजे ज्ञानपीठ प्राप्त झालेल्या कोंकणी साहित्यिकाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून त्यांच्या उपस्थितीत हे वक्तव्य करणे म्हणजे तर पाहुणचाराचा हा अजब नमुनाच म्हणावा लागेल. पाहुण्याला घरी बोलवायचं, त्यांना गोड दूध घ्या म्हणून प्यायला द्यायचं आणि जाणीवपूर्वक त्या दुधात साखरेऐवजी मिठाचा खडा टाकायचा. एवढेच नव्हे तर ते मीठ म्हणजेच साखर आहे असा हट्टाग्रह धरायचा. याला आपण मराठी संस्कृतीतले सौजन्य म्हणायचे का? खचितच नव्हे. हा आहे निव्वळ उद्धटपणा; नव्हे, उद्धटपणाचा कहर! 

गोबेली सत्याचे पाईक?

कोंकणी-मराठीचे नंतर बोलू, परंतु मराठेतर इतर भाषिक कोणत्याही साहित्यिकाला पाहुणे म्हणून बोलवायला माझा सुरवातीपासूनच वैयक्तिक विरोध होता असे जाहीररित्या सांगण्यापर्यंत या अध्यक्षमहाशयांची मजल गेली. केवळ बहुमतामुळे आज तुम्ही या व्यासपीठावर आहात असेच ते सर्वांदेखत मावजोंना सुचवत होते. कोणत्याही संस्थेत वैयक्तिक मतमतांतरे असतातच. परंतु ती चार भिंतीच्या आड व्यक्त करायची असतात, जाहीररित्या नव्हे आणि पाहुण्यांच्या पुढ्यात तर नव्हेच नव्हे हे लोकशाही संकेत चक्क प्राचार्यपद भूषविलेल्या या अखिल भारतीय अध्यक्षांना ठाऊक नाही असे म्हणण्याचे धाडस कोण करेल? कारण त्यांनी तर चक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या भाषणातून खोटारडेपणाचा कळस गाठला. इतिहास अर्धवट सांगून वा चक्क खोटा इतिहास सांगून लोकांची दिशाभूल करणे हा आजकाल राष्ट्रीय पातळीवरील राजकीय संकेत झालेला आहे. हे महाशयसुद्धा त्याच पठडीतले आहेत की काय? गोबेली सत्याच्या परंपरेचे पाईक? 

कोंकणीविषयीचे आपले अगाध ज्ञान प्रदर्शित करताना त्यांनी आवर्जून सांगितले, “मी अभ्यास करून बोलतो आहे.” अर्थात ते जे बोलले ते पहाता तो अभ्यास नव्हे तर केवळ एक आभास तयार करण्याचा प्रयत्न होता हे निःसंशय. त्यांनी तोडलेले अकलेचे तारे हे त्यांच्या स्वतःच्या गैरसमजाच्या प्रांगणातील आहेत की गोव्यातील कोंकणीद्वेष्ट्या मूठभर मराठी’वाद्यां’च्या डोक्यातले आहेत ते ठाऊक नाही. जर त्यांना चुकीची माहिती देण्यात आलेली असेल तर मात्र त्यांच्या ज्ञानाची कीव करावी तेवढी थोडीच. कारण राष्ट्रीय पातळीवरील अत्युच्च साहित्य संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितले म्हणून असत्य सत्य होऊ शकत नाही. आणि अर्धसत्य पूर्णसत्य होऊ शकत नाही. 

बोरकरांनी कोंकणी लिहिलीच नाही?

कौतिकरावांनी मराठी साहित्यरसिकांच्या प्रांगणात एक खडा सवाल केलाः “गोमंतकीय कवी बा भ बोरकर 50 वर्षे केवळ मराठीतून लिहीत होते, कोंकणीतून का लिहीत नव्हते?” बा भ बोरकरांना संपूर्ण गोवा व महाराष्ट्रसुद्धा ‘बाकीबाब’ म्हणूनच ओळखतो. मराठीत विपुल साहित्यनिर्मिती केलेल्या या कवीला 1981 वर्षी मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांच्या ‘सासाय’ या कोंकणी काव्यसंग्रहाला मिळाला होता हे संपूर्ण साहित्य जगताला ठाऊक आहे. ते या ‘अभ्यासपूर्ण’ प्राचार्यांना ठाऊक नसावे? त्यांची ‘पांयजणां’ ही कोंकणी कविता तर एवढी लोकप्रिय होती (आजही आहे) की खुद्द पु ल देशपांडे ती स्वतःही गायचे याची दूरदर्शनसुद्धा साक्ष आहे. त्यांची साहित्यसंपदा कोंकणी व मराठी या दोन्ही भाषांतून आहे. 1950 साली, म्हणजे गोवा मुक्तीपूर्वी, मुंबईत झालेल्या कोंकणी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तदनंतर 29-30 सप्टेंबर 1967 रोजी परत मुंबईतच झालेल्या नवव्या अखिल भारतीय कोंकणी परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. 

खुद्द बाकीबाब सांगतात त्यानुसार 13-14 वर्षांचे असताना शणैं गोंयबाब वाचून त्यांना कोंकणी मातृभाषेचा साक्षात्कार झाला. म्हणजे 1923-24 साली. तेव्हापासून ते कोंकणी लिहू लागले. मात्र त्यांचे काव्यसंग्रह आधी प्रसिद्ध झाले ते मराठीतील आणि नंतर कोंकणीतील, एवढाच काय तो फरक. 1946 साली सुरू झालेल्या गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी रचलेल्या कोंकणी आणि मराठी कविता प्रचंड गाजल्या. खास करून कोंकणी कविता तर जनमानसाने डोक्यावर घेतल्या. त्यानंतर त्यांनी कोंकणी आणि मराठीतून नियतकालिकेही चालवली. आणि हे महाभाग विचारतात बा भ बोरकरांनी 50 वर्षे कोंकणीत साहित्य का रचले नाही?

मावजोही कोंकणी लिहीत नव्हते?

त्याहून मोठी लोणकढी थाप तर कौतिकरावांनी मारली खुद्द मावजोंबद्दल, आणि तीही त्यांच्याच उपस्थितीत! म्हणे मावजोसुद्धा कोंकणी राज्यभाषा होईपर्यंत मराठीतच साहित्यनिर्मिती करत होते. कोंकणी गोव्याची राज्यभाषा झाली 1987 वर्षी. वयाच्या 19व्या वर्षी 1963 साली मावजोंची ‘तूं वचूं नाका’ ही पहिली कोंकणी कथा प्रसिद्ध झाली होती. कोंकणीला राज्यभाषेचा दर्जा मिळेपर्यंत त्यांची एकूण सहा पुस्तके - कथासंग्रह व कादंबऱ्या - प्रसिद्ध झालेल्या होत्या. इतर स्थानिक पुरस्कार सोडूनच द्या, त्यांच्या ‘कार्मेलिन’ या कोंकणी कादंबरीला 1983 वर्षी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांच्या या कादंबरीचे साहित्य अकादमीने एकूण 15 भाषांमध्ये अनुवाद केलेले आहेत. मराठीत,  आसामी, बंगाली, मैथिली, नेपाळी, गुजराती, सिंधी, पंजाबी, तामीळ, कन्नड, हिंदी आणि इंग्रजी. त्यातील मराठीसहित इतरही कित्येक अनुवादांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले आहेत. 

 

आणि तरीही हे अभ्यासक त्यांच्याच पुढ्यात सांगतात - राज्यभाषा होईपर्यंत ते केवळ मराठीतच लिहीत होते. मावजो केवळ मराठीतच नव्हे तर इंग्रजीतूनही लिहितात. त्याशिवाय ते पोर्तुगीजही शिकलेले आहेत. बहुभाषिकता ही गोव्याची खासियत आहे. कित्येक गोमंतकीयांनी पोर्तुगीज भाषेतून साहित्य निर्मिती केलेली आहे. गोव्यातील पहिले ज्ञानपीठकार रविन्द्र केळेकार हिंदी व गुजरातीतूनही लिहायचे. डॉ मनोहरराय सरदेसाय यांनी तर फ्रांसमध्ये शिकताना फ्रेंच कथा लिहून त्या देशात राष्ट्रीय पातळीवरील पहिला पुरस्कार पटकावला होता. अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील. पण म्हणून काय त्या त्यांच्या मातृभाषा बनतात?

डोगरीबरोबर कोंकणीला मान्यता देण्याचे राजकारण?

ठाले पाटीलांचा आणखीन एक अभ्यासपूर्ण शोध म्हणजे भारत सरकारने कोंकणीला स्वतंत्र भाषा म्हणून दिलेल्या मान्यतेचा. उत्तर भारतातील जम्मू आणि हिमाचल प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या डोगरी बोलीला साहित्य अकादमीतर्फे भाषिक दर्जा देण्याचे घाटत होते. परंतु केवळ एकाच बोलीला दर्जा दिल्यास त्यामागचा राजकीय पक्षपातीपणा उघड्यावर पडेल म्हणून म्हणे त्यांनी दक्षिणेतील (?) कोंकणी ही बोली उचलली आणि डोगरीबरोबर तिलाही मान्यता देऊन टाकली. “बोली शोधली ती कोंकणी आणि बळी दिला तो मराठीचा.” 1975 वर्षी या दोन्ही बोलींना भाषा म्हणून म्हणे मान्यता देण्यात आली. 

प्रत्यक्षात ही मान्यता भारत सरकार नव्हे तर राष्ट्रीय साहित्य अकादमी देत असते. ही स्वायत्त संस्था राजकारणी नव्हे तर साहित्यिक चालवतात. सोडून द्या. सत्य काय आहे? डोगरीला भाषा म्हणून साहित्य अकादमीने मान्यता दिली ती 2 ऑगस्ट 1969 रोजी. आणि 1970 पासून या भाषेतील साहित्याला साहित्य अकादमी पुरस्कारही देण्यास सुरवात झाली. कोंकणी भाषेला साहित्य अकादमीची मान्यता देण्याची मागणी कित्येक वर्षे होत होती. परंतु ती मराठीची बोली आहे असा मराठी साहित्यिकांचा हट्टाग्रह असल्याने हा निर्णय बरीच वर्षे लांबला. शेवटी कोंकणीला मान्यता मिळाली ती फेब्रुवारी 1975 मध्ये. अकादमीने स्थापन केलेली तज्ञांची समिती, अकादमीची कार्यकारिणी आणि अकादमीच्या सर्वसाधारण सभेत सखोल चर्चा झाल्यानंतरच कोंकणीला ही मान्यता मिळालेली आहे. तीही डोगरीला मान्यता मिळाल्यावर तब्बल सहा वर्षांनी. 

आणि हे ‘सत्यनिष्ठ’ महाशय सांगतात राजकारणाचा भाग म्हणून या दोन्ही बोलींना 1975 वर्षी भाषा म्हणून मान्यता देण्यात आली. कोंकणीला मान्यता देणाऱ्या तज्ञांच्या समितीमध्ये डॉ ए एम् घाटगे हे मराठी भाषातज्ञही होते. ते काय राजकारणी होते? उलट कोंकणीला भाषा म्हणून मान्यता देऊ नये यासाठी राजकीय दबाव होता. गोव्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी “कोंकणीला भाषा म्हणून मान्यता दिल्यास गोव्यात रक्ताचे पाट वाहतील” असे धमकीवजा पत्र साहित्य अकादमीला पाठविले होते. थापा मारताना ऐतिहासिक सत्याची तरी लाज बाळगा ना!

फादर स्टीफन्सचे अर्धसत्य

सहाशे वर्षांपूर्वी मराठी हीच गोमंतकीयांची मातृभाषा होती असा आणखीन एक दावा ठाले पाटील करतात. म्हणजे पंधराव्या शतकात. आणि त्यासाठी दाखला देतात सतराव्या शतकात फादर थॉमस स्टीफन्स यांनी मराठीतून लिहिलेल्या ‘क्रिस्तपुराण’ या ग्रंथाचा, आणि त्यातील मराठी भाषेविषयी लिहिलेल्या काही ओळींचा. 

जैसी पुस्पांमाजि पुस्प मोगरी l कि परिमळांमाजि कस्तुरी ।

तैसी भासांमाजि साजिरी l मराठिया।।

याचाच अर्थ तेव्हा लोकांची भाषा मराठी होती आणि म्हणूनच फादर स्टीफन्सनी ‘क्रिस्तपुराण’ मराठीतून लिहिले असा त्यांचाच नव्हे तर कित्येक मराठी’वाद्यां’चा दावा आहे. 

या साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे असलेले दामोदर उर्फ भाई मावजो यांनी वर उल्लेखिलेल्या कोणत्याही मुद्यावर आपल्या भाषणातून भाष्य केले नाही. (हे अस्सल कोंकणी सौजन्य!) परंतु फादर स्टीफन्सबद्दल मात्र त्यांनी आवर्जून सांगितले. ठाले पाटीलांनी सांगितले ते अर्धसत्य कसे आहे ते अप्रत्यक्षरित्या सांगण्यासाठी. त्यासाठी त्यांनी क्रिस्तपुराणाच्या प्रस्तावनेतील दोन ओळी वाचूनही दाखविल्या. 

ठाई ठाई ब्राह्मणी उतरे मिश्रीत करोनि लिहिले आहे 

मावजोंच्या मते त्याकाळी उच्चशिक्षित ब्राह्मण मराठीचा वापर करीत व फादर स्टीफन्सनी त्यांच्याकडून पुराण कसे लिहावे ते शिकून घेऊन ‘क्रिस्तपुराण’ लिहिले होते. परंतु हे ‘क्रिस्तपुराण’ घेऊन ते जेव्हा ख्रिश्र्चन बनलेल्या तळागाळातील बहुजन समाजाजवळ गेले तेव्हा ते त्यांना कळेनासे झाले. म्हणून त्यानंतर त्यांनी कधीच मराठीत पुस्तक लिहिले नाही.

पोर्तुगीज व फ्रेंच भाषेवर प्रभुत्व असलेले कोंकणी कवी डॉ मनोहरराय सरदेसाय फा स्टीफन्सवर लिहिताना सांगतातः 

“क्रिस्तपुराण जरी मराठीत लिहिलेले असले तरी त्यात कोंकणी शब्दांचा सर्रास वापर केलेला आहे. इतिहासकार राजवाडेंनी ज्ञानेश्र्वरीच्या प्रस्तावनेत लिहिले आहे की कोंकणीचा वापर करून लिहिलेले हे मराठी पुराण आहे. फादर स्टीफन्सनी क्रिस्तपुराण जरी मराठीत लिहिले तरी त्यानंतर कॅटॅकिझम, म्हणजे धार्मिक तत्वे शिकविणारा ग्रंथ मात्र त्यांनी कोंकणीतच लिहिणे पसंत केले. एवढेच नव्हे तर फादर स्टीफन्स यांनी रोमन लिपीतून कोंकणीचे व्याकरणही छापून प्रसिद्ध केले. कारण त्याकाळी छपाईच्या तंत्रज्ञानात देवनागरीक लिपीतील खिळे उपलब्ध नव्हते. त-थ-द-ध-न हे t-th-d-dh-n असे लिहावे आणि ट-ठ-ड-ढ-ण हे tt-tth-dd-ddh-nn असे लिहावे हे प्रस्थापित केले.”

फादर स्टीफन्सबद्दल सांगतानाच भाई मावजोंनी संत नामदेवांचेही उदाहरण दिले. तेही चौदाव्या शतकातील भाषांचे अस्तित्व दाखवणारे. त्यासाठी त्यांनी संत नामदेवांची पाच लोकभाषांनी गायलेली गवळण म्हणूनच दाखवली. मराठी, कानडी, उर्दू, गुजराती व कोंकणीतून रचलेली गवळण. 

भाई मावजोंनी आपल्या भाषणात आणखी एक गोष्ट सांगितली. 1683 मध्ये संभाजी महाराजांनी गोव्यावर स्वारी करून गोवा जवळजवळ काबीजच केला होता. परंतु अचानक मोगलांनी मराठा राज्यावर स्वारी केल्याने त्यांना गोवा पूर्णतया काबीज करण्याची मोहीम अंतिम टप्प्यात सोडून निघून जावे लागले. या मोहिमेसाठी गोव्यातील हिंदू व नव-ख्रिश्र्चनांनी संगनमत करून संभाजी महाराजांना मदत केली होती असा दाट संशय पोर्तुगीज सत्ताधाऱ्यांना होता. परंतु ते सगळेच जण आपापसात स्थानिक कोंकणी भाषेतून बोलत असल्याने ते काय बोलतात हे पोर्तुगीजांना समजत नव्हते. म्हणून त्यांनी कोंकणी भाषेच्या वापरावरच बंदी घातली. ती बंदी विसाव्या शतकापर्यंत टिकली. त्यामुळेच कोंकणी भाषेच्या विकासाला खीळ बसली. 

संविधानाशी राजद्रोह

आणि आता शेवटचा एकच मुद्दा. कोंकणी आणि मराठीविषयीचा दुजाभाव नष्ट व्हावा म्हणून मराठीही गोव्याची राज्यभाषा करावी आणि त्यासाठी मावजोसारख्या कोंकणी लेखकांनी सहकार्य करावे असे आवाहन कौतिकरावांनी केले. त्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून गोव्यात प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकांची यादीच त्यांनी वाचून दाखवली. (मात्र त्याच काळात रोमी व देवनागरी लिपीतून कोंकणी नियतकालिके प्रसिद्ध होत होती हे मात्र सांगितले नाही. स्वतः बा भ बोरकर कोंकणी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतून नियतकालिके संपादित करीत होते.)  मात्र ही मागणी करताना त्यांचा मूळ युक्तिवाद कोणता? तर कोंकणी ही मराठीची बोलीच आहे. बोलीला राज्यभाषेचा दर्जा दिला, मग भाषेला का नाही?

आणि इथेच तर सगळी गोम आहे. आम्ही गोमंतकीय मराठी भाषा शिकतच नाही, नुसती वाचीत-लिहीतच नाही तर या भाषेवर अपार प्रेमही करतो. भाई मावजोंनीही मराठी साहित्य संमेलनाच्या प्रांगणात हेच आवर्जून सांगितले. इतकेच नव्हे तर पुढचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गोव्यात घ्या, आम्ही कोंकणी लेखकही ते यशस्वी करण्यासाठी पूर्ण सहकार्य करू असे घोषितही केले. “माझ्या हल्लीच प्रसिद्ध झालेल्या कोंकणी कथासंग्रहासाठी अरुण खोपकरांनी लिहिलेली प्रस्तावना अनुवादित न करता मराठीतच प्रसिद्ध केलेली आहे. हा काय माझा मराठीचा द्वेष आहे?” असा खडा सवालही त्यांनी केला.  

परंतु वादाचा मुद्दा आहे तो एकच. ठाले पाटीलांच्या मते गोव्यातील बहुसंख्य लोक मराठीच बोलतात, मात्र तिची बोली कोंकणी आहे. म्हणून मराठी राज्यभाषा व्हावी. आता एकाच वेळी कोंकणी ही बोलीही आणि भाषाही हे कसे काय होईल? एक तर ती बोली आहे वा ती भाषा आहे. आणि हा प्रश्र्न तर कधीच सुटलेला आहे. 1975 मध्ये साहित्य अकादमीने, 1987 मध्ये 555 दिवस चाललेल्या प्रखर जनआंदोलनातून कोंकणी राज्यभाषा झाल्यावर आणि शेवटी 1992 मध्ये भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट करून ती राष्ट्रभाषा म्हणून मान्य केल्यावर. तरीसुद्धा कोंकणी ही बोलीच आहे हेच तुणतुणे वाजवत मराठीला गोव्याची राज्यभाषा करण्याची मागणी म्हणजे गोव्यातील जनतेशी केलेली प्रतारणा आहे, भारतीय संविधानाचा केलेला अवमान आहे आणि एका राष्ट्रीय भाषेशी केलेला राष्ट्रद्रोह आहे हेही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या लक्षात येत नाही काय? की कुसुमाग्रजांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास खरोखरच हे साहित्य महामंडळ ‘काळोखाचे पुजारी’ झालेले आहे?

 

कौतिकराव ठाले पाटील आणि दामोदर मावजो यांची भाषणे प्रत्यक्ष ऐकण्यासाठी खालील यू ट्यूब लिंकवर क्लिक करा

उदगीर मराठी साहित्य संमेलन

कौतिकराव ठाले पाटीलः 47.49

दामोदर मावजोः 1.30.08



Disclaimer: Views expressed above are the author's own.



कोंकणी ही मराठीची बोली असल्याचे जे विधान कौतिकरावानी केले, त्याला एक प्रखर मराठिवादी म्हणून माझा विरोध आहे. मराठी भाषा ही गोव्याची कोंकणी बरोबरीने राजभाषा आहे, या भूमिकेचा की आहे, हे आधीच नमूद करतो. परंतु जेव्हा राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात कोंकणीचा समावेश झाला, तेव्हाच कोंकणी ही स्वतंत्र भाषा कि बोली, या वादावर पडदा पडला. एरवीही मनोहरराय सरदेसाई यांनी म्हटले आहेच की "माड काय कवथो खबर ना, चलीकाय बायल खबर ना, बोली काय भास खबर ना; पुण कवथो एक दिस माड जाता, चली एक दिस बायल जाता, बोली एक दिस भास जाता". सरदेसाई यांचे हे विधान जणू प्रकृतीचा नियम समजावते.

कौतिकराव यांनी जी गरळ ओकली, त्याचे खंडन किंवा समर्थन करणे माझ्या दृष्टीने बिनमहत्वाचे आहे कारण वादग्रस्त वक्तवये करण्यात त्यांचा हातखंडा आहे. परंतु गोव्यात मराठीला दुय्यम स्थान दिले जाते, हे मान्य करावेच लागेल. दामोदर मावजो यांनी आता काहीही भूमिका घेतली असली तरी अनेक कोकणीवादी "मराठी महाराष्ट्रातून गोव्यात आली" असा दुष्प्रचार करण्यात धन्यता मानतात. गोव्यात मराठीला राजभाषा करणे सोडाच (राजकीय व सामाजिक बहुमता अभावी ते आज शक्य नाही! नरेश सावळ यांनी विधानसभेत खाजगी ठराव आणला होता तेव्हा म.गो. ने त्याचे समर्थन केले नाही त्यातच सर्वकाही आले), निदान राजभाषा कायद्याद्वारे सहभाषेचे दिलेले स्थान किती कोंकणी म्हाल्गड्यांना मान्य आहे. मावजो याचे उत्तर देतील का ?

शेवटी एवढेच म्हणेन की आज इंग्रजीच्या प्रभावामुळे कोंकणी व मराठी, दोहोंना धोका आहे. एकमेकांच्या हातात हात घालून व कोतेपणा बाजूस सारून दोन्ही भाषा भगिनिन्नी वाटचाल करावी. तसेच कौतिकराव व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अन्य धुरिणांनी बृहन्महाराष्ट्रात मराठीच्या विकासाकरिता काय केले, याचा लेखा जोखा द्यावा. तसेच या विषयावर ठणाणात करणार्‍या प्रदीप घाडी आमोणकर यांनी गोमंतक मराठी परिषदेची दुरावासस्था बघावी.

माझे हे मत आपण प्रकाशित करणार, अशी अपेक्षा.

 
सदानंद म. रायकर |

Blogger's Profile

 

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

 

Previous Post

 

Archives