Saturday 07 September 2024

News Analysed, Opinions Expressed

CLEAR CUT

दांभिकांच्या जगातला तत्वनिष्ठ ‘फाटका माणूस’: सीताराम टेंगसे

 

टेंगसे सरांवर लेख नव्हे, पुस्तक लिहायला हवे. अत्यंत साध्या पद्धतीने जगणारा उच्च विचारांचा भोक्ता, प्रचंड वाचन असलेला विद्वान, कित्येक भाषांवर प्रभुत्व असलेला भाषाप्रभू, सर्वभाषिक साहित्याचा उपासक, आयुष्यात कसलीही तडजोड न करता जगलेला तत्वनिष्ठ, सखोल अभ्यास करून मुद्देसूदपणे व सडेतोडपणे भुमिका मांडणारा निर्भय पत्रकार, विज्ञानाशी निष्ठा बाळगून जगणारा सुधारक आणि माणुसकीच्या वृत्तीने वागणारा स्पष्टवक्ता मित्र अशी कित्येक विशेषणे टेंगसे सरांना लावता येतील.



‘बोले तैसा चाले, त्याचि वंदावि पाउले’ हे आजकाल वापरून गुळगुळीत झालेले सुभाषित. हल्ली त्याला ‘वॉक द टॉक’ असेही म्हणतात. आणि मग कुठेही कुणासाठीही कसेही ते वापरतात. परंतु या जगात अवघीच काही माणसे असतात त्यांना ती प्रत्यक्षात लागू होतात. त्यातलेच एक म्हणजे सीताराम टेंगसे सर. काणकोणमधील लोलये गावात मुक्तिपूर्व काळात कर्मठ पुजारी घराण्यात जन्माला आलेला हा संस्कृतचा पंडित. पुण्यात शिकताना मार्क्स शिकला, महाराष्ट्रातील सर्व विचारसरणींच्या पुरोगामी चळवळी कोळून प्याला व आपल्याच गावात शिक्षक म्हणून परत आला. रिटायर मात्र झाला एक पत्रकार म्हणून. हा संपूर्ण प्रवास करताना सर जगले अत्यंत साधेपणाने. साधी राहणी उच्च विचारसरणीचे मूर्तीमंत उदाहरण. सरस्वती त्यांच्या पेनावर नुसती नाचायची. सर पांढऱ्यावर काळे करायचे आणि आमची डोकी सणकून टाकायचे. कधीही प्रक्षोभक काही लिहिले नाही, परंतु पचपचीत म्हणावे तसे रटाळही लिहिले नाही. जे लिहिले ते मुद्देसूद आणि बेधडक भुमिका मांडून. कुणाची बिशाद नाही झाली कधी त्यांचे मुद्दे खोडून काढायची. 

आपल्या आयुष्याची शेवटची काही वर्षे त्यांनी स्वेच्छेने बांदोडेच्या स्नेह मंदिरात काढली. हल्ली त्यांना दिसत नव्हते, ऐकायलाही नीट येत नव्हते. परंतु वाणी मात्र तशीच होती. खणखणीत. आणि विचार तर विचारूच नका. आधी मला कोविड झाला, नंतर त्यांना, आणि त्यांना माझे पुस्तक द्यायचे राहूनच गेले. वाचायला घेतले असते तर सर्वांनी कौतुक केलेल्या या पुस्तकाची चिरफाड नक्की केली असती त्यांनी. तसं त्यांचा कित्ता गिरवतच मी या पुस्तकातून गोव्याच्या राजकारणाची मीमांसा केलीय. केवळ राजकारण म्हणून बघून नव्हे, तर आर्थिक, ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक अशा सगळ्या दृष्टोकोणातून गोव्याच्या राजकारणाकडे बघून. हे सगळे मी तरी त्यांच्याकडूनच शिकलो. पण त्यांच्यासाखी झेप घेणे मला जमलेले नाही हे मलाही पक्के ठाऊक आहे.

टेंगसे सर माझे पत्रकारितेतले गुरू. शिक्षक बनून त्यांनी कधीही मला पत्रकारिता शिकवली नाही. तांत्रिक गोष्टी वगैरे तर अजिबात नाही. 1987 चा काळ. त्यावेळी आमची विद्यार्थी चळवळ संपूर्ण भारतभरच कोसळली होती. मार्क्सवादी तत्वांवर चालणाऱ्या क्रांतिकारी चळवळीविषयी आम्हीही थोडे उद्विग्नावस्थेतच होतो. पोटापाण्यासाठी म्हणून पत्रकारिता पहावी करून म्हणून तेव्हाच सुरू झालेल्या ‘सुनापरान्त’ ह्या कोंकणी दैनिकात तत्कालीन संपादक चंद्रकांत केणी यांना भेटायला गेलो. ते ‘राष्ट्रमत’चेही संपादक होते.त्यांनी अर्धवेळ पत्रकार म्हणून मला घ्यायचे मान्य केले. दोन्ही वृत्तपत्रांसाठी. ‘सुनापरान्त’मध्ये बातमच्या लिहायचे काम मी अर्ध्या तासात उरकायचो. आणि मग ‘राष्ट्रमत’मध्ये एक-दोन तास तरी सहज. रात्रपाळीला टेंगसे सर असायचे. एका बाजूने स्थानिक बातम्यांचे संपादन व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातम्यांचा अनुवाद करीत बातम्यांचा फडशा पाडायचे. दुसऱ्या बाजूने आजच्या बातम्यांच्या संदर्भात चर्चा. तीच माझी पत्रकारितेची शाळा झाली. 

सकाळी गेलो तर सर संपादकीय लिहिण्यात गुंतलेले. पीटीआयच्या छोट्या-मोठ्या कागदांवर लिहायचे, लिहून संपले की गेला कागद अक्षरजुळणीला. त्यातच आमच्याशी गप्पा, कुणी बातमी वा जाहिरात घेऊन आला तर त्यांची सरबराई असे करीत संपादकीय लिहायचे. तरीही कधीही एकही संपादकीयाचा मजकूर कमीही झाला नाही आणि जास्तही. कोंकणीत आम्ही ज्युस्ताज्युस्त म्हणतात तसा. दुसऱ्या दिवशी ते संपादकीय वाचून आम्ही चाट पडायचो. कारण त्यात फकत वर्तमान विषयावर केलेले भाष्य नसायचे. त्या विषयाचे सर्व अंगांनी विश्लेषण करून व त्याचा इतिहास तंतोतंत सांगून केलेली तर्कशुदध चिकित्सा असायची ती. दुसऱ्या दिवशी त्या संपादकीयावर चर्चा करायला गेलो तर त्यांचा पहिला प्रश्न ठरलेला - “काय कोणत्या विषयावर लिहिले होते मी?  आहे संपादकीयासाठी जागा म्हणून खरडायचे काही तरी. कोण वाचतात देव जाणे.” मात्र रत्नकांत पावसकरांसारखे चिकित्सक सांगायचे - “टेंगसेंचे अग्रलेख केवळ वाचनीय नसतात, ते संग्राह्य असतात.” आमच्यासारख्या होतकरू तरुणांसाठी तर ती मेजवानीच असायची विचारांची. 

एवढ्याच गोष्टी नाही शिकलो मी त्यांच्याकडून पत्रकारितेतल्या. त्यांची पत्रकारिता तशी सुरू झाली होती ‘गोमंतवाणी’ या 1964 साली मडगाव शहरात सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्रातून. मराठी हीच गोव्याची मातृभाषा व गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण झालेच पाहिजे या भुमिकांचा पुरस्कार करणारे हे वृत्तपत्र. टेंगसे सर स्वतःही या गोष्टींचा पुरस्कार करणारे होते. कालांतराने ते बंद पडले व टेंगसे सर “राष्ट्रमत’ मध्ये रुजू झाले. संपादक चंद्रकांत केणी कट्टर कोंकणीवादी तर टेंगसे सर तेवढेच कट्टर मराठीवादी. गोवा वेगळा रहावा ही तर खुद्द ‘राष्ट्रमत’चीच भुमिका. टेंगसे सरांचा कल महाराष्ट्रवादाकडे. टेंगसे सरांची संपूर्ण हयात ‘राष्ट्रमत’मध्ये गेली. नंतर स्वतः संपादकही झाले. 1987 मध्ये ‘सुनापरान्त’ हे कोंकणी दैनिक सुरू करताना केणी ‘राष्ट्रमत’ टेंगसे सरांकडे पूर्ण विश्वासाने सोपवून आले. “पण आमच्यामध्ये कधीच वाद झाला नाही वा आमचे संबंधही कधीच बिघडले नाहीत” हे टेंगसे सर नेहमीच अभिमानाने सांगायचे. केणीही तेवढ्याच उच्च वैचारिक पातळीवरील व्यक्ती होते म्हणूनच हे शक्य झाले. माझा पत्रकरितेतला हा दुसरा धडा. तो माझ्या पद्धतीने मी अजून गिरवतोय. राजकारण हे केवळ राजकारण नसते तर अर्थकारण हाच त्याचा स्थायी भाव असतो व त्याला ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक असे विविध पैलू असतात हेही मी टेंगसे सरांकडूनच शिकलो. 

कोंकणी-मराठीवर आमचेही त्यांच्याशी कधी पटले नाही. परंतु आमच्या विद्यार्थी चळवळीला पूर्णतया पाठिंबा देणाऱ्या पत्रकारांमध्ये सर्वात अग्रणी कोण असतील तर ते टेंगसे सर. कित्येक पत्रकारांनी व संपादकांनी आमच्या चळवळीला अक्षरशः वाळीत टाकले होते. पाच-दहा हजारांच्या सभेचीसुद्धा एक कॉलमची बातमी इतर वृत्तपत्रातून प्रसिद्ध व्हायची. मात्र न्याय मिळायचा तो ‘राष्ट्रमत’मध्ये. रात्रपाळीला असलेल्या टेंगसे सरांकडून आणि त्यांच्या हाताखालीच तयार झालेल्या प्रमोद प्रभुगावकरकडून. इतर वृत्तपत्रांसाठी आम्ही छोटीशी प्रसिद्धी पत्रके काढायचो तर ‘राष्ट्रमत’साठी तिथे कार्यालयात जाऊन वेगळी बातमी लिहायचो. राजू नायक विद्यार्थी असताना तोही लिहायचा. सर डाव्या विचारसरणीचे होते म्हणून अंधपणे तिचा पुरस्कार केलेला मी कधी बघितला नाही आणि उजव्या विचारसरणीच्या विरोधात असले तरी त्यांना कधी त्यांनी वाळीतही टाकले नाही. उलट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मडगावातील निर्विवाद पुढारी र वि जोगळेकर सर आणि आमची प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स युनियन यांच्यातील वैचारिक युद्ध केवळ ‘राष्ट्रमत’मध्येच चालायचे. टेंगसे सर त्याचा दिलखुलास आस्वाद घ्यायचे आणि आम्ही कधी समोरासमोर आलो तर न्यायमूर्तीच्या थाटात आमच्या विचारांचा समाचारही घ्यायचे. त्यातनंच तर आम्ही हिंदुत्ववादी जोगळेकर सरांचेही चाहते झालो. 

परंतु टेंगसे सर हे केवळ पत्रकार नव्हते. हाडाचे शिक्षक होते ते. सुरवातीला आमच्या गावातील मी स्वतः शिकलेल्या श्री निराकार विद्यालयाचे 1959 पासून पाच वर्षे मुख्याध्यापक होते. माझा तर त्यावेळी जन्मही झाला नव्हता. त्यांच्याच प्रयत्नाने आमच्या शाळेला मॅट्रिकची पुणे बोर्डाची परीक्षा घेण्याची मंजुरी मिळाली होती. त्याशिवाय लोलयेच्या श्री दामोदर विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्षही होते. पण गावच्या दलित मुलाला प्रवेश देण्याच्या प्रश्नावरून व्यवस्थापनातील काही सभासदांशी त्यांचा वाद झाला व अध्यक्षपदाचा त्याग करून ते मोकळे झाले अशा गोष्टी आम्ही नंतर त्यांच्याविषयी ऐकल्या होत्या. देवदासी कुटुंबातील मुलीबरोबर प्रेम जुळल्यावर संपूर्ण ब्राह्मण जमातीचा रोष पत्करून त्यांनी तिच्याशी विवाह केला होता ही गोष्ट तर आमच्या पिढीसाठी प्रेरणादायकच होती. त्यांच्या या आंतरजातीय विवाहाचा निषेध म्हणून गावच्या काही ब्राह्मणांनी जिवंतपणी त्यांचे श्राद्ध वाढले होते याही अचंबित करणाऱ्या गोष्टी आम्ही ऐकल्या होत्या. मग तर ते गावच सोडून मडगावला आले व तिथे शिक्षक म्हणून रुजू झाले. जेव्हा 1980च्या दशकात मी मडगावात शिकायला आलो त्यावेळी तर ते आमच्यासाठी एक प्रत्यक्ष न पाहिलेले श्रद्धास्थानच होते.

एक हाडाचा शिक्षक व जातिवंत पत्रकार असलेली ही व्यक्ती केवळ भाषाप्रभुत्वाच्या जोरावर लेखणीशी खेळत जगली नाही. जे बोलले-लिहिले तेच जगायचे हा त्यांचा खाक्याच होता. त्यामुळेच गोमंत विद्या निकेतनसारखी संस्था त्यांना जवळची झाली. दत्ता दामोदर नायकांसारखे विचारवंत उद्योजक त्यांचे परमस्नेही बनले. मराठी विज्ञान परिषदेचा पाया तर गोव्यात त्यांनीच घातला. मला अजून आठवतेय. सारस्वत समाजाची स्थापना झाल्यावर आमचा काहींचा त्यांच्याशी जाहीर वाद झाला. त्यातून समता आंदोलनाची स्थापना झाली. त्यावेळी एका बैठकीत दोन मान्यवर उच्चवर्णीय स्वातंत्र्यसैनिक आम्हाला पटवून देत होते की ही चळवळ ‘आम्ही’ पुढाकार घेऊन पुढे नेली पाहिजे. एक-दोनदा ऐकल्यावर टेेंगसे सरांची सटकली. कोणताही मुलाहिजा न राखता त्यांनी उभे राहून त्या दोघाही स्वातंत्र्यसैनिकांना खडसावून विचारले - “आम्ही आम्ही म्हणता म्हणजे स्वतःला अजूनही ब्राह्मणच मानता ना तुम्ही? नकोय आम्हाला असल्या जातिभिमान्यांचा पाठिंबा.” त्यांच्या त्या एका प्रश्नानेच समता आंदोलनाची दिशा स्पश्ट झाली. आम्ही तरूण मुले त्यांचे समतावादी भक्त झालो. 

टेंगसे सरांवर लेख नव्हे, पुस्तक लिहायला हवे. अत्यंत साध्या पद्धतीने जगणारा उच्च विचारांचा भोक्ता, प्रचंड वाचन असलेला विद्वान, कित्येक भाषांवर प्रभुत्व असलेला भाषाप्रभू, सर्वभाषिक साहित्याचा उपासक, आयुष्यात कसलीही तडजोड न करता जगलेला तत्वनिष्ठ, सखोल अभ्यास करून मुद्देसूदपणे व सडेतोडपणे भुमिका मांडणारा निर्भय पत्रकार, विज्ञानाशी निष्ठा बाळगून जगणारा सुधारक आणि माणुसकीच्या वृत्तीने वागणारा स्पष्टवक्ता मित्र अशी कित्येक विशेषणे टेंगसे सरांना लावता येतील. वाईट एकाच गोष्टीचे वाटते. जो मानमरातब या उत्तुंग व्यक्तिमत्वाला मिळायला हवा होता तो मिळाला नाही. मडगावसारख्या सांस्कृतिक शहरात राहूनसुद्धा. कारण मडगावच्या व्यापारी जगतातला तो एक फाटका माणूस होता. आधी सायकलवरून व नंतर मोपेडवरून फिरायचा. आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहून जगायचा. सर्वांशी मिळून मिसळून वागायचा. पण या भौतिक जगाचा व्यवहार त्यांना समजला नाही. आणि या दांभिक स्वरुपाच्या व्यावहारिक समाजाला ही व्यक्ती कधी उमगली नाही. ती आपण टेंगसे सरांची हार मानायची का? 

(हा लेख आजच्या नवप्रभा मध्ये प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.



Blogger's Profile

 

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

 

Previous Post

 

Archives