भारतीय जनता पार्टी ऑफ काँग्रेस
या राजकीय नौटंकीमध्ये खरी फरफट होईल ती भाजपामधील प्रामाणिक कार्यकर्त्यांची आणि कालपर्यंत भाजपाचे आमदार आणि मंत्री म्हणून मिरवलेल्या भगव्या पुढाऱ्यांची.
चला, एकदाचे भारतीय जनता पार्टीचे घोडे मांडवीत न्हाले. एकाच झटक्यात सत्ताधारी पक्षाने आपले 34 उमेदवार जाहीर केले. आपला पक्ष चाळीसही जागा लढवणार हेही गोव्याचे पक्ष निरीक्षक देवेन्द्र फडणवीसांनी जाहीर केले. म्हणजे सहा राहिले. डिचोली, कळंगूट, कुंभारजुवे, सांताक्रूझ, कुठ्ठाळी आणि कुडतरी.
त्यातील कुडतरी सोडल्यास इतर मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार होते. पण त्यातील कळंगूटचे आमदार मायकल लोबो आणि कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी स्वतःहूनच भाजपा सोडला. मायकलनी काँग्रेसमध्ये उडी टाकून आपणासहित आपल्या बायकोलाही उमेदवारी पटकावली. एलिना आम आदमी पार्टीच्या उमेदवार झाल्या. डिचोलीचे आमदार आणि सभापती राजेश पाटणेकर यांनी आपण निवडणूकच लढवणार नाही अशी घोषणा करून नांगी टाकली. कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर व्याधीग्रस्त झाल्याने ती जागाच रिकामी झालेली आहे. सांताक्रझचे आमदार टोनी फॅर्नांडीस बाबूश मोंसेरातचे शेपूट पकडून काँग्रेसमधून भाजपात आलेले होते. त्यांना म्हणे सध्या बाबूशचे शेपूटच सापडत नाही आणि भाजपाला सांताक्रूझचा उमेदवार. त्याशिवाय वास्कोचे कार्लोस आल्मेदा आणि मयेचे प्रवीण झांट्ये यांनीही भाजपाला रामराम ठोकला आहे.
त्याहूनही जास्त मजेशीर गोष्ट कुडतरीची. माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो यांनी डिसेंबरमध्ये काँग्रेसची साथ सोडून भाजपात प्रवेश केला होता. परंतु काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांनी अचानक आमदारकी आनी पक्षाचाही त्याग केला आणि ‘नवी सकाळ’ शोधीत ते ममता ममता करीत कोलकोत्त्यात पोचलेसुद्धा. इथे अचानक ख्रिसमसचे मीस ऐकताना मोरेन रिबेलोना साक्षात्कार झाला की भाजपा जातीयवादी आहे, तिच्या राज्यात चर्चवर हल्ले होत आहेत आणि प्रधानमंत्री मोदी अल्पसंख्यांकांवर अत्याचार करीत आहेत वगैरे वगैरे. मग ते घुसले काँग्रेसच्या कळपात आणि काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी देऊनसुद्धा टाकली. त्याबाजूने नवी सकाळ घेऊन येणारा सूर्य रेजिनाल्डना सापडून सापडेना. बापुडे आपला एवढा मोठा देह घेऊन काळोखात धडपडत दिदींचा पदर सोडून लागले गांधींना हाका मारायला. पण काँग्रेसने त्यांचा हात परत पकडण्यास स्पश्ट नकार दिला. बुडत्याला काडीचा आधार या नात्याने आता चिखलातील कमळाचा देठ तर ते शोधीात नसतील ना? त्यामुळेच कुडतरीचा उमेदवार भाजपाने अजून जाहीर केलेलाा नसावा ना? बघूया. की नुवे आणि बाणावलीत नाममात्र उमेदवार ठेऊन अपक्ष उमेदवारांशी केलेले सेटिंग कुडतरीतही होईल?
हे अशक्य आहे असे अजिबात नाही. कारण भाजपामध्ये चिखलातनं वर आलेली शुद्ध कमळं राहिलीतच किती? आयतेच सापडलेले सत्तेचे कमळ नाचवणारे ‘हात’च इथंतिथं चमकतना दिसताहेत. म्हणजे कालपर्यंत आपली सत्ता टिकवण्यासाठी मनोहर पर्रीकरांनी हातवाल्या काँग्रेस आमदारांना आपल्या कवेत घेतले होतेच. 2017 च्या निवडणुकीतच माविन गुदिन्हो, पांडुरंग मडकईकर व प्रवीण झांट्ये या काँग्रेसवाल्यांना आपले अधिकृत उमेदवार केले होते. आणि निवडणुकीनंतर तर सुरू झाला काँग्रेच्या आमदारांंचा कमलपुष्पांवर अभिषेख. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजिनामा दिलेल्या विश्वजीत राणेंनंमतर सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटेही भगवी वस्त्रे धारण करून पवित्र झाले. नंतर त्यांचाच कित्ता गिरवून मगोचे दोन वा काँग्रेसच्या चक्क दहा आमदारांना डॉ प्रमोद सावंतांनी चिखलातून वर काढले आणि मंत्रीपदांवर आरूढसुद्धा केले. हे करताना भाजपाचे सरकार घडविणाऱ्या गोवा फॉरवर्ड आणि मगोच्या ढुंगणावर चक्क लाथच हाणली आणि लावले त्यांना सरकार दरबारातून हाकलून. तेव्हापासनं भाजपाच्या एकूण 27 मधले 18 आमदार हे काँग्रेस आणि मगोवाले होते. माविन, मडकईकर व झांट्ये धरून.
आता तर आपण वेगळे आहोत हे सिद्ध करून दाखवण्यासाठीच की काय, परंतु भाजपाने विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यावर आणखीनही पराक्रम केले आहेत. काँग्रेसचे रवी नाईक, गोवा फॉरवर्डचे जयेश साळगावकर व दोन अपक्ष आमदार रोहन खंवटे व गोविंद गावडे यांच्याही डोक्यावर सेंजावच्या फेस्तातील कमळाचे कपेल चढवले आहे. म्हणजे पंधराचे झाले 19. आणि हीच खरी भारतीय जनता पार्टी आहे हे आता सिद्धही करून दाखवलेय. त्यातल्या 15 जणांना भाजपची अधिकृत उमेदवारी जाहीर करून. वगळले ते केवळ काणकोणचे इजिदोर फॅर्नांडीस आणि सावर्डेचे दिपक प्रभू पाऊसकर यांना. बाकी झाडून सगळे फुटीर आज कमळाचे बाशिंग गुडघ्याला बांधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यातले आजगावकर, जयेश, रोहन आणि गोविंद सोडले तर राहिलेले 13 काँग्रेसवाले आहेत. म्हणजे अनधिकृतरित्या ही आता भारतीय जनता पार्टी ऑफ काँग्रेस झालेली आहे हे निःसंशय.
हे फक्त एवढ्यावरच संपत नाही. मायकल व त्यांची बायको डिलायला ह्या दांपत्याला उमेदवारी नाकरणाऱ्या भाजपाने दोघा-दोघा दांपत्यांना निवडणुकीच्या बोहल्यावर चढवलेले आहे. बाबूश आणि जेनिफर मोंसेरात आणि विश्वजीत व दिव्या राणे. याचे समर्थन करताना तर फडणवीसांनी अक्षरशः बाँबच टाकला. त्यांनी म्हणे पर्येची सीट लढवण्यासाठी काँग्रसचे पुढारी प्रतापसिंग राणेंनाच आमंत्रण दिलेले होते. परंतु त्याऐवजी माझ्या सुनेला पर्येतून उमेदवारी द्या असे म्हणे सासऱ्यानेच सुचवले. म्हणजे दिव्या राणे ही आता विश्वजीतची बायको म्हणून नव्हे तर प्रतापसिंगांची सून म्हणून निवडणूक लढवण्याचे दिव्य करणार आहे. हा दावा कितपत खरा कितपत खोटा ते आता प्रतापसिंगांनाच सिद्ध करावे लागेल. हे एवढ्या सहज होऊन जाईल की या दाव्यामुळे पर्येमध्ये रणकंदन माजेल ते आता सत्तरीचे खाशेच ठरवतील.
या राजकीय नौटंकीमध्ये खरी फरफट होईल ती भाजपामधील प्रामाणिक कार्यकर्त्यांची आणि कालपर्यंत भाजपाचे आमदार आणि मंत्री म्हणून मिरवलेल्या भगव्या पुढाऱ्यांची. भाजपाचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले लक्ष्मीकांत पार्सेकर आता काय करणार? कालपर्यंत बाबूशना घाम काढणारे दत्तप्रसाद नाईक ताळगावमध्ये आता काय झाडू मारणार? एक आणि दोन नव्हे, बहुतेक सगळ्याच मतदारसंघांमध्ये भाजपाच्या केडरची गोचीच होईल असे वाटते. कारण या सगळ्या राज्य टिकवण्याच्या सत्तांध खेळात ओरिजिनल भाजपावाले उमेदवार म्हणून राहिलेत इनमिन नऊ. स्वतः डॉ प्रमोद सावंत, मिलिंद नाईक, ग्लेन टिकलो आणि जोशुआ फॅर्नांडीस हे चार विद्यमान आमदार. आणि माजी आमदार दयानंद मांद्रेकर, दामू नाईक, सुभाष फळदेसाई, रमेश तवडकर व गणेश गावकर. वास्कोत उमेदवारी दिलेले दाजी साळकरसुद्धा मागच्या निवडणुकीतील बंडखोर आहेत.
म्हणजे भाजपाने अधिकृतरित्या 34 उमेदवार जाहीर करून आम्हा गोंयकारांना एक गोष्ट सांगितलेली आहेः ही ओरिजिनल भाजपा नाही. डुप्लिकेट आहे. तेव्हा डुप्लिकेट सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला मते द्या. आता मतदार काय करतात ते बघूया. आपल्या मताचे ओरिजिनली विचार करून दान करतात की डुप्लिकेट?
(हा लेख आजच्या तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झाला)