Thursday 12 September 2024

News Analysed, Opinions Expressed

जितेपणी मरत नाही, तो.... विजय सातपुते

 

जिंकूच नाही दिलं आम्हाला कधी या आमच्या परमपूज्य गुरुवर्यांनी सांगितलंही नाही कधी तू हरलास म्हणून, पण विजय मात्र सातपुत्याचाच



(Illustration by Ved Prabhudesai)

विजय सातपुते

यात विजयही नाही आणि पराजयही

सात पूत तर नाहीच नाही, यांच्या पुतांची गणतीच नाही

जो कोणी अवचिन्न तो यांचा पूत, जी कोणी फित्रिक ती यांची धूव

दामोदर कॉलेजचा दंडकच होता तो

हे महाशय शिकवायचे हायर सेकंडरीत, पण त्यांचे विद्यार्थी थर्ड इयरपर्यंत

आणि एक्स-स्टुडंटसुद्धा, चार-चार पाच-पाच वर्षांचे, चक्रमली डिव्होटेड

मीही असलाच एक स्टुडंट, त्यांच्या क्लासमध्ये कधीच न शिकलेला

पण सातपुतेंचा स्टुडंट म्हणून अभिमानाने मिरवणारा

“अशीच भेटली रे मला, रस्त्यातच, आपटलीच म्हण की येवून अंगावर

मीही घेतली मग तिला शिंगावर, खांद्यावर, पाठीवर, पोटावर, आणि xxxxxx

तेव्हापासनं आमचा प्रणय रंगतच चाललाय

रात्र म्हणून नाही, दिवस म्हणून नाही….”

- कुठल्या क्लासमधली सर, नाव काय तिचं सर? (आम्ही आवंढे गिळीत)

“अरे, कविता रे...” असं म्हणून आपली चारोळी

आमच्या अंगावर फेकून लागायचे चालायला

आम्ही ओशाळवाणे, फुटली रेsss करीत, लंगडत, त्यांच्या मागे मागे

लंगडीच घालत वावरलो आम्ही त्यांच्या मागे मागे कॉलेजच्या ग्रावंडवर

आणि हा प्राणी मात्र बिनधास खेळला आमच्या लंगडीशी

कधी कबड्डी, कधी खो खो, कधी काहीही, सगळे नियम धाब्यावर बसवून

जिंकूच नाही दिलं आम्हाला कधी या आमच्या परमपूज्य गुरुवर्यांनी

सांगितलंही नाही कधी तू हरलास म्हणून, पण विजय मात्र सातपुत्याचाच

कधी बोलणं भन्नाट, कधी वागणं भन्नाट, लिहिणं तर केवळ भन्नाटच

मग आमची सताड उघडलेली कवाडं का आणि कधी म्हणून होणार बंद?

आम्ही उघडे-नागडेच वावरलो कॉलेजमध्ये सकाळ-संध्याकाळ-रात्रीबेरात्रीसुद्धा

केवळ कपडे घालणे एवढीच काय ती एक फॉर्मेलिटी, बाकी सगळा नंगा नाच!

लिहिणं बेताल, गाणं बेताल, कविता बेताल आणि नाटकही बेताल-त्रिताल-चारताल

तिथंच गावला आम्हाला आमच्याही नकळत, अचानक, हातातून निसटणारा

जगण्याचा सूर आणि आयुष्याकडे बघण्याचा ताल!

“यंदा कला अकादमीच्या स्पर्धेत एकांकिका करायची”

मारली आपलीच एक ‘अंधारशाळा’ आमच्या अंगावर, प्रकाशझोत कसा

वा कधी श्लोकांच्या यमकांमध्ये गुंतवलेले अगम्य अजीब ‘शनीमहात्म्य’

- सर, आम्ही मार्क्स स्कँडलवर स्ट्रीट प्ले बसवून करणार गोवाभर

“मी आहे तुमच्या पाठीशी, पण एक, मागे सरायचं नाही ऐनवेळी”

प्रॅक्टीस कुठे म्हणून काय विचारता? सरांचा फ्लॅट हाच आमचा कर्मयोग्यांचा मठ

रात्रीचा मुक्काम कायम तिथेच, सरही तिथेच झोपायचे कुठेतरी जागा शोधून

मध्येच कधीतरी आई वारली तर – “काय सांगू, आईच्या उशीखाली कवितांचा ढीग”

खरं खोटं तेच जाणे, एरवीही त्यांचं खरं-खोटं, नादच दिला होता सोडून आम्ही

पण लीलावती सातपुते कोकणी-मराठी कविता स्पर्धा हे मात्र स्फूर्तीदायक सत्य

गोवाभरातल्या सगळ्याच क्रिएटिव्हांना दिलेलं उघड उघड आव्हान

शब्दांना ढिश्यूं ढिश्यूं करीत आम्ही उतरायचो कवितेच्या कुस्ती-मैदानात

आणि हे सातपुते महाशय टाळ्या पिटायचे आमची उडालेली भंबेरी बघत

प्रायझ मिळालं तर हाणायचे एकेक लामणदिवा आमच्या टाळक्यावर – ट्रॉफी!

त्यांचे ते लामणदिवे आजही लोंबकळताहेत मागे-पुढे करीत आमच्या डोस्क्यांमध्ये

जाणीव करून देत आम्हाला – बाबा रे, वय वाढलं म्हणून माणूस भंपक होत नसतो

झालास भंपक तर संपलीच तुझी करिअर, उठलास तू आयुष्यातनं, तुझं लाईफ बेकार

“जग, शहाण्या जग, अडकवू नकोस स्वतःला बार्ब्ड वायर्समध्ये हिपोक्रसीच्या....

जग, माझ्यासारखा, मी अजूनही जगतोय तसा

साठी म्हणून नाही माझी बुद्धी नाठी, नाठाळाच्या माथी हाणतोय अजूनही काठी

तसाच जग तूही, विजय सातपुते बनून...

नाही जमत?  मग मर साल्या जितेपणी, सरणावर चढेपर्यंत....रोज...”

आम्ही जगतोय, सर.

हो; जगतोय?

Disclaimer: Views expressed above are the author's own.



Sandeshbhai, Apratim ! Those who have teacher like Satputesir, are really lucky...

 
pramod koyande |

Blogger's Profile

 

संदेश प्रभुदेसाय

संदेश प्रभुदेसाय पेशान पत्रकार. पूण मुळांत एक कार्यकर्तो. पत्रकार जायत सावन साहित्य निर्मणी पुरायेन बंद केल्या. ताचे आदीं कवितां वा गितां सारकी साहित्य निर्मणी केल्या. पूण हालींच्या तेंपार फकत वैचारीक लिखाण चड. चुकून केन्नाय हेर साहित्य निर्मणी जाता तितलीच.

 

Previous Post

 

Archives