बिगर-गोमंतकीय कामगारः अंधारातल्या सावल्या
आमच्या आयुष्याचे “नट-बोल्ट” फिक्स करण्यासाटी “ ग्रीस” प्रमाणे काम करणाऱ्या कामगारांची किंमत आम्हांलाच कळत नाही. ती बिचारी माणसे अंधारातल्या सावल्या बनून आमची पाठराखण करतात आणि आम्हांला त्याची जाणीव सुध्दा नसते.
दिसतं तस नसतं आणि म्हणूनच जग फसतं. आमच्या, म्हणजेच माणसांच्यांबाबतीतही, तेच घडतेय. तथाकथित उच्चवर्गीय झालो वा पैशांची पैश्यांचीं गर्मी असली की मग आम्हांला वाटायला लागतं की आम्ही स्वयंभू आहोत. आम्हांला कोणाचीच गरज नाही. पण “ गरज” ही टाळी प्रमाणे असते, दोन परस्पर हातांशिवाय ती भागत नाही.
आता काही उदाहरणेच घ्या. घरातली आजी आजारी पडते. तिला दवाखान्यात ठेवावं लागणार, तुम्ही तिच्यासोबत दवाखान्यात थांबलात तर घरची आबाळ होणार, नाही थांबलात तर तिची. अशा वेळी गरज भासते ती कामवालीची. घरात पाण्याचा नळ बिघडलाय, दुरूस्त करायला गरज भासते ती प्लंबरची, गटार घाण पाण्यानं तुंबलय, ते साफ करण्यासाठी गरज लागते ती सफाईवाल्याची. आणि कामवाली बाई, प्लंबर, सफाई कामगार ह्यांना गरज असते कामांची. पोट भरण्यासाठी मिळणाऱ्या संधीची. पण नेमकी हीच गोष्ट आम्हांला समजत नाही वा कदाचित ती आम्हांला समजून घ्यायची नाहीय. आणि म्हणूनच जन्मापासून मरणापर्यंत आणि सकाळपासून संध्याकाळ पर्यंत ज्या माणसांची आम्हांला गरज लागते त्या माणसांना आम्ही “ भायले” वा “ घाटी” म्हणून संबोधतो आणि त्यांना हिणवतो. आम्हाला त्यांची घृणा वाटते.
गोव्यात कुठेही काहीही बिघडलं की आम्ही बिनधास्त त्याचं खापर स्थलांतरितांच्या माथी मारून मोकळे होतो. चोरी-मारी, खून-दरोडे, बलात्कार, कचरा प्रश्र्न, लोकसंख्यावाढ — सगळे काही “भिंगटाकारां” मुळे होतं. शिकून-सवरूनसुद्धा खरं काय खोटं काय ह्याची शहानिशा करण्याची आम्ही तसदी घेत नाही. असतात स्थलांतरित लोकांमध्येही गुन्हेगारी वृतीची माणसे. पण ह्याचा अर्थ काय सगळेच स्थलांतरित गुन्हेगार असतात? आणि सगळेच गोंयकार सज्जन आहेत का?
नकारात्मक गोष्टींचा राईचा पर्वत करायचा आणि सकारात्मक गोष्टींची दखलअंदाजी करायची ही आमची जनरीत आपण आता बदलायला हवी. पोटापाण्यासाठी आपला गांव, आपली माणसं, आपलं कुटुंब सोडून स्थलांतरित परक्या ठिकाणी जातात. स्वत:चे घर सावरताना आपल्या भूमीत श्रम करून आपल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतात. पण श्रम आणि कश्टांचे मोजमाप कोण करतंय? आणि तेही “ भायल्यांचे”? अर्थांत, उच्च आणि मध्यमवर्गीय स्थलांतरितांचा मात्र उदोउदो केला जातो. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला जातो. पण आमच्या आयुष्याचे “नट-बोल्ट” फिक्स करण्यासाटी “ ग्रीस” प्रमाणे काम करणाऱ्या कामगारांची किंमत आम्हांलाच कळत नाही. ती बिचारी माणसे अंधारातल्या सावल्या बनून आमची पाठराखण करतात आणि आम्हांला त्याची जाणीव सुध्दा नसते.
2006 मघ्ये मी विकास अध्ययन केन्र्द आणि चिल्र्डन्स राईट्स इन गोवा ह्या संस्थांसाठी गोव्यातील गरीब स्थलांतरिता श्रमजीवींच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनशैलीचा आढावा घेण्यासाठी सर्वेक्षण केले होते. त्यांच्या एकूण जीवनशैलीशी निगडित प्रश्र्नावली तयार करून सासश्टी, तिसवाडी, बार्देश, काणकोण, फोंडा, डिचोली, मुरगांव, सत्तरी आणि पेडणे तालुक्यांत राहाण्याऱ्या 590 प्रौढ आणि 360 मुलांना आम्ही भेटलो. ह्या सर्वेक्षणात काही गोष्टी आढळून आल्या त्या अचंबित आणि अस्वस्थही करणाऱ्या होत्या:-
1. 1970 ते 1980 च्या दरम्यान काम शोधण्यासाठी मोठया प्रमाणात बाहेर गांवातून माणसे यायला लागली. कारण कश्टांची, हलकी-सलकी कामे करायला गोव्यात माणसे मिळत नव्हती. 1966 मध्ये स्थलांतरीतांची संख्या 1 टक्के होती ती 2000 सालांनंतर 27 टक्क्यांवर आली.
2. काम शोधण्यासाठी गोंयकार आखाती देशात जातात, तिथे मिळेल ती कामे करतात पण तेच काम गोव्यात करायला तयार होत नाहीत. मग कामगारांचा तुटवडा भरून काढण्यासाठी कंत्राटदार बाहेर गांवातून कामासाठी कामगार आणतात. खास करून बांधकामासाठी मजूरांना इथे आणले जाते. पण हे कंत्राटदार त्यांच्या मुलभूत गरजांकडे लक्ष देत नाहीत. खरं म्हणजे कायद्याने कंत्राटदाराने मजूरांसाठी राहण्यासाठी घर, पाणी, वीज, संडास, आरोग्याची देखभाल, मुलांच्या शिक्षणाची सोय करायला पाहिजे. पण ह्या मजूरांना त्यांची मजूरी सोडून काहीच मिळत नाही. अर्थात, ह्याला काही अपवाद नक्कीच असतील.
3. काही बांधकाम कंत्राटदार बांधकामाच्या जागेवर कामगारांना तात्पुरती राहाण्यासाठी जागा देतात. मग काम झाल्यानर काहीजण त्यांना हाकलून लावतात तर काहीजण दुर्लक्ष करतात. मग तिथेच एका वस्तीचा जन्म होतो.
4. पण ह्या सर्वेक्षणानुसार वस्तीत वा झोपडपट्टीत रहाणारे स्थलांतरित असतात केवळ 8% तर 50% लोक भाड्याच्या घरात राहातात. भाड्याची किमंत भरमसाठ असते, परंतु रहाण्यासाठी जागा मात्र अगदीच छोटी असते. ह्या पाहणीनुसार फक्त 4% लोक चांगल्या घरात राहातात.
5. ह्या स्थलांतरितांमध्ये 20% लोक हंगामी स्वरूपाचे असतात. ते फक्त सीझन असतानाच गोव्यात राहातात आणि ऑफ सीझनमध्ये आपापल्या गावी जातात. 32% स्थलांतरित 15 वर्षांहून जास्त काळ इथे रहातात व कायदेशीररित्या आपण त्यांना गोंयकार म्हणू शकतो. त्यातले 42% आमच्यासारखे मासळी खातात.
6. हे स्थलांतरीत इथे येऊन कसलीही कामे करतात. उदा. घरकाम, शेतमजुरी, मच्छिमारी, बांधकाम, रस्ते दुरूस्ती, बागकाम, नळ दुरूस्ती, सफाईकाम, सुरक्षा-रक्षकाचे काम. मूलतः शेतकरी असल्याने त्यांना ह्या कामांचा तसा पुर्वानुभव नसतो. तरीपण गोव्यात येवून ते हे कौशल्य आत्मसात करतात. यातली कुठलीही कामे गोमंतकीय करत नाहीत. तरीही आम्ही आमची नोकरी हे “भायले” कामगार नेतात म्हणून का कोकलतो हे एक न समजण्यापलीकडचे कोडे आहे.
7. इथे येऊन सगळेच स्थलांतरित श्रीमंत झालेत वा होतात हा आणखीन एक गैरसमज गोंयकारांमध्ये आहे. पण वस्तुस्थिती तशी नाहीय. इथे येणारे 70% स्थलांतरित रोजंदारी पध्दतीवर काम करतात. म्हणजेच “काम नाही तर दाम नाही “. कुणी बिचारा आजारी पडला तर त्याच्या घरात चूल पेटेल की काय ह्याची खात्री नसते. म्हणून जास्तीत जास्त मजूर आपली दुखणी अंगावरच काढतात. घरातील कर्ता वारला तर कुटुंबाची आबाळ होते. कारण रोजंदारी पध्दतीत कुठे आलीय पेन्शन आणि ग्रेच्युअटी?
8. सर्वसामान्यपणे आमची जीवनशैली बघता, आम्ही पांच-सहा वर्षाचे असताना शाळेत जातो. 18-19 पर्यंत ग्रेज्युएट होतो. काही भाग्यवान पुढे शिकतात, बाकीचे स्वत:च्या नशिबाला दोष देत नोकरी करतात. हळूहळू स्वत:चे ज्ञान, कला-कौशल्य, हिकमतीच्या जोरावर आयुष्यात पुढे जातात. साठीनंतर रिटायर होतात. हा झाला आमच्या तुमच्या आयुष्याचा आलेख. स्थलांतरित कामगार लहान असताना शाळेत गेलेच तर 13-14 वर्षांवर शाळा सोडतात. त्यामुळे जास्तीच जास्त वयाच्या चाळीशीपर्यंत काम करू शकतात. लहान वयात कश्टांची कामे करणे, अर्धपोटी राहाणे, अंगावर दुखणी काढणे आणि भट्टीची दारू पिणे अशा विविध कारणांमुळे यातले बहुतेक जीवनाची पन्नाशी ओलांडू शकत नाहीत.
9. पण गोव्यात राहून त्याच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी पण घडायला लागल्यात. सर्वेक्षणात असे आढळून आले की 17% जोडप्यांना एकच मूल आहे, 62% जोडप्यांना तीन मुले तर केवळ 21% जोडप्यांना तीनांपेक्षा जास्त मुले आहेत. ह्याचाच अर्थ असा होतो की कटुंब नियोजना विषयी त्यांना जाणीव होते आहे.
10. स्थलांतरितांमधल्या 98% लोकांना केवळ एकच बायको असते.
11. गोव्यात आल्यामुळे शिक्षणाविषयीची जागृती त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात झाली आहे. 93% पालक स्वतः अशिक्षित असतात, परंतु त्यांच्यातील 84% आपल्या मुलांना शाळेत पाठवतात. परंतु त्यातली अर्धी मुले परिस्थितीमुळे मध्येच शाळा सोडतात. किमान अर्ध्या मुलांना दहावी पास व्हायचं असतं तर 40% मुलांना उच्च शिक्षण घ्यायचं असतं.
12. स्थलांतरितांमधली 36% मुले आठवीपुढे मजल मारूच शकत नाही. याउलट गोमंतकियांमध्ये गळती सुरू होते ती आठवी ते दहावीमध्ये.
13. 42% स्थलांतरित व्यवस्थित कोंकणी बोलू शकतात, मात्र त्यांची 64% मुले अस्खलित कोंकणी बोलतात.
14. यातल्या 96% मुलांना गोवा आवडतो व त्यांना गावात परत जायचं नसतं. आणि तरीही आपण त्यांना म्हणतो ‘घाटयांचीं बुरशीं भुरगीं’…
म्हणजे स्थलांतरितांमध्ये गुणात्मक बदल होतो आहे. परंतु आपण तो मानायला अजून तयार नाही. शेवटी गोव्यातील असो वा गोव्याबाहेरील. आम्ही सगळे भारतीयच ना? जर ते इथे येवून गोव्याच्या विकासाला त्यांचा हातभार लागतोय व त्यातून त्यांचे राहाणीमान सुधारतेय तरीही आपण त्यांना भायलेच म्हणणार का?
म्हणून आता वेळ आली आहे अंर्तमुख होण्याची. आम्हांला घरकामासाठी, शेतमजुरीसाठी, मच्छिमारीसाठी, बांधकामासाठी, रस्तेदुरूस्ती, बागकाम, नळदुरूस्ती, सफाई कामासाठी, सुरक्षा-रक्षकाच्या कामासाठी मजूर मोठया मुश्कीलीने मिळतो. राश्ट्रीय कौशल्यविकास महामंडळाच्या सर्वेक्षणानुसार 1917-22 पर्यंत “ड” वर्ग कामगारांची टंचाई वाढेल. मग काय होणार आमच्या डामडौलाचं? अशा वेळी काळाची गरज समजून घेऊन आम्ही बदलणार की आमच्याच हाताने....?