Tuesday 21 May 2024

News Analysed, Opinions Expressed

WHITE MANE

सूदिर सूक्तः निषेध विष्णू विरोधकांचा, आणि विष्णूचाही!

 

विष्णूंच्या कविता संग्रहास पुरस्कार मिळू नये म्हणुन ज्यानी अट्टाहास केला व ज्या सरकारने हा पुरस्कार फेटाळला त्यांचा मी निषेध करतो. त्याचबरोबर विष्णूचाही निषेध करतो. ‘सरस्वतीने’ ने प्रदान केलेलं अती सुंदर शब्द भंडार असलेला हा ‘कुबेर’ बहुजन समाजाने कधीच फेकून दिलेली घाणेरडी ‘कवने’ पुन्हा पुन्हा का वापरतो?


विष्णू वाघांच्या ‘सूदिर सूक्त’ या काव्यसंग्रहास कोंकणी अकादमीचा उत्त्कृष्ट साहित्यासाठीचा पुरस्कारास जाहीर विरोध झाल्यादिवसापासून विष्णुच्या एकदंर साहित्याबद्दल तसेंच त्यांच्या वैयक्तीक जीवनाबद्दल उलटसुलट चर्चेचे पेव फुटले आहे. विष्णू जर्जर शरीर व्याधीनी ग्रस्त आहेत. ते स्वतः कांही मैदानात उतरून आपल्यावरील टिकेला उत्तर देऊ शकत नाहीत. त्यामुळे चर्चासत्रे आयोजीत करून सूदिर सूक्त आणि विष्णू यांच्यावर स्तुती सुमना बरोबर शिव्यांचाही वर्षाव होत आहे. खुद्द विष्णूनेच शिव्याशापांचा आणी जातीय विद्वेशाचा अवलंब आपल्या लिखाणात केल्यामुळे विष्णूना लाखोली वाहणार्‍यांचे हात कोणी धरूं शकत नाही. उलट घटनादत्त भाषण आणि आविष्कार अधिकाराचा नागरिकांचा मूलभूत हक्क नाकारण्याचा कोणताही अधिकार खुद्द विष्णूलाही  नाही.

विष्णूनी अश्लील शब्दांची पेरणी आणि सारस्वतांबद्दलचा आपला राग व्यक्त करताना कसलीहि लाज वा कोणाचा ही मुलाहिजा ठेवलेला नाही. शुद्र समाजावर शतकानुशतके सारस्वतानी अन्यायच केला. त्याना पशुसमान वागणूक दिली. त्यांची उत्पादनाची साधने, जमीन जुमला सारे कांही हडप केले. शिक्षणापासून त्याना वंचीत ठेवले. त्यांचे देव आपलेसे केले. पोर्तुगीज कालीन राजकीय वरदहस्ताचा उपयोग करून सारस्वतानी बहुजनसमाजाची सर्वतोपरी लूट केली. विष्णूच्या  मनांतला हा राग उ॑फाळून आला आणी त्याने सारस्वतांविरुध्द काव्यास्त्र उचलले. त्याला ‘ शिव्यास्त्र’ जोडले आणि सूदिरसूक्तरुपी ‘ब्रम्हास्त्र’फेकले.    विष्णूने फेकलेल्या अस्त्राच्या ह्या मार्‍यातून पळतांपळता जमेल तेव्हढी टीका व जाहीर शिव्याशाप देण्याचा उद्योग सुरु झालाय.  या सार्‍या उपक्रमाचा विष्णूला झाला तर फायदाच होईल. कोणी त्याच्या साहित्याची नामदेव ढसाळ यांच्या विद्रोही साहित्याशी तुलना करतो आहे.  तर कोणी त्याला संत तुकारामाचा अवतार मानायला लागलेत. तसा ‘तुकाराम’ विष्णूचा जवळचा ‘आप्तेष्ट’. ‘तुका झाला अभंग अभंग’ हे विष्णूचे गाजलेले नाटक. भटाब्राम्हणानी संत तुकारामाचा यथेच्च छळ केला, त्याचे अभंग इंद्रायणीत बुडवले. आपल्या अलौकीक स्मरणशक्तीच्या व प्रतिभेच्या जोरावर तुकारामाने हे ग्रंथ इंद्रायणी काठी बसून पुन्हा लिहून काढले. चिडलेल्या ब्राम्हणानी  त्याची हत्या केली, प्रेतही कोणाच्या हाती लागू दिले नाही. खून लपविण्यासाठी ब्राम्हणानीच प्रत्यक्ष विष्णूने आपले पुष्पक विमान पाठवून संत तुकारामाला सदेह वैकुठाला नेला अशी आवई उठवली. विष्णुंच्या लेखणीने या ब्राम्हणावर आसूड ओढले. भट ब्राम्हण  विरुदध शूद्र कुणबी असा लढा विष्णूने मोठ्या कौशल्याने आपल्या नाटकांत रंगवला. ‘तुकलो’ या नावांची एक कविता ‘सूदिर सूक्तांत’ आहे. तुकारामाच्या अभंगातून माझा आत्माच हंबरतो आहे, आणि त्याच्या चिपळीचा नाद माझ्या हृदयात झंकारतो आहे असा सुंदर Metaphor ते त्यात वापरतात.

‘तुक्या.....

 म्हाज्या आत्म्याचें अजाण पाडूक

तुज्या अंभगातल्यान हामेता...

तुज्या चिपळेचो छिन छिन नाद

माज्या काळजात थेमेता’.

( पाडूक-पाडस, वासरुं, हामेता – हंबरते आहे

काळजात थेमेता – काळजाचे पाणी पाणी करतो)

‘वेदांचा तो अर्थ आम्हासींच ठावा’ किंवा ‘भले देऊ गांडीची लंगोटी। नाठाळाच्या माथी हाणूं काठी’ असं सांगणारा गिरवाण भाषेत कासेला ‘गांड’ म्हणणारा ‘तुका’ नव्हे ‘तुकलो’ विष्णुला प्रिय आहे. दुष्ट ब्राम्हणानी तुक्याचे अभंग इंद्रायणीत बुडविले असले तरी ‘भौजनसमाजाच्या व्हटयेंत ते पयलींच तुज्या अध्यात्माचे वीर्य सांकळल्ले’ अशा शब्दरुपात विष्णू गौरव करतात.

‘तुकल्या,

तूं आमचो राखणो, तूं वाटाडो,

तूं गाय, तूं हरण, तूं घोण

जिणेक हुल्पावपी होमखणांतल्यान

आमकां आरपार घेवन वचपी तू धोण’

(धोण – शिरगांवच्या जत्रेंत अग्निदिव्य करणारा  भावीक

हुल्पवपी – जाळणारा, होमखण – होम –कुंड) ह्या शब्दानी विष्णु आपली तुकाराम भक्ती व्यक्त करतात. विद्रोही कवी म्हणून ते ‘सूदिर सूक्तातून’ अवतरतात.

बहुजनसमाजाला प्रस्थापितानी केलेल्या प्रचंड अत्याचाराची व अन्यायाची जाणीव कधीच झाली होती.  राजकीय अस्मीता जागृत झालेल्या बहुजन समाजाने वर्ण वर्चस्वाचे जोखड स्वातंत्रोत्तर कालखंडाच्या पहिल्याच कालखंडात फेकून दिले. बहुजनांचे सरकार मतपेटीद्वारा साकार झाले. ह्या सरकाराने अन्यायाचा बिमोड करण्यासाठी पाऊले उचलली. सार्वत्रीक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. वाड्यापाड्यात शाळा उघडून शिक्षणाचे द्वार बहुजनासाठी खुले केले. जमीन महसूल, कुळ मुंडकार इत्यादी प्रगतीशील कायदे करून राबणार्‍या, घाम गाळणार्‍या कष्टकर्‍याना शिक्षीत करून अभिजनाच्या बरोबरीने पुढे जाण्याचा मार्ग प्रकाशीत केला. पण देऊळे मंदीरे सारस्वतांच्या हाती राहिली. पोर्तुगीज काळात मंदीर विषयक कायद्याचे ज्ञान त्यानाच होते. महाजनकायद्याखाली देवळांची नोंदणी त्यानीच केली, स्वताकडे महाजनकी व अधिकारपदे आरक्षीत ठेवली. या मंदीरांच्या भक्ताना, कुळाव्याना, भगताना त्यानी ‘चाकर’ (serventes किवा servants) संबोधून कायद्याच्या कुंपणात बहुजनसमाजाला ढकलले. तिथून त्यांची आजही सुटका नाही. विष्णूंचं हृदय या अन्यायाखाली पिचते. चुलीतल्या निखार्‍याप्रमाणे विष्णूंच्या मनात हा राग धूमसतोय.

‘चुलीन गोबराच्या राशिपोंदा

भितल्याभितर भगभगपी

 ताबड्यागुंज उज्या भाशेन’

विष्णू सुर्या वाघाच्यो ह्यो कविता...

 सरभवतणच्या भूंयेंत

 मायंडाभाशेन मुंगरोन रावलेल्या

   सुप्त ‘जातीयतेचेर’

उघडपणान  केल्लो हो एक आघात.....

अशा शब्दांद्वारे, ‘अपुरबाय’ ही प्रकाशन संस्था त्यांच्या कवितांची ओळख करून देते.

आपण काय लिहीतो आहोत याची पूर्ण जाणीव ठेऊनच विष्णूने काव्यलिखाण केलंय. सर्वसंग परित्याग करून वेताळा प्रमाणे नागडा उघडा होऊन भीडमुर्वत न ठेवता मला समाजासमोर उभं राहायचं आहे असं सांगताना ते समाजाला आव्हान देतात. ‘नवो जल्म’ ह्या कवितेत विष्णू लिहितात.

‘सगळी वस्तरा भिरकटावन

नागडो बेताळ कसो

तुमचे मुखार रावतलों उबो.

म्हाजें हें रुप

तुमी पळवक शकतले?

असा प्रश्न करून समाजास ते आव्हान देतात. माझे हे रुप तुम्ही पाहू शकाल कि, शेपूट घालून पळत सुटणार?  ‘शेपूट घालून’ असा महाजनकी साळसुद शब्द प्रयोग नकरतां ते सरळ सरळ गांवरान भाषा वापरतात ‘काय गाणीन शेपडी घालून सांवळेक दसोन रावतले.?’ विष्णूंची ही रांगडी, रानवट, खेडवळ पण अशीष्ट गणली गेलेली भाषा वापरण्याचं ध्राष्ट्य किती लोकांत आहे?

उपर्ल्लेखीत शब्दप्रयोग म्हणजे किस झाडकी पत्ती.  विष्णूने शिष्ट – अशीष्ट, श्लाघ्य- अश्लाघ्य, श्लील – अश्लील ह्या सीमारेषा ह्या संग्रहात नुसत्या ओलांडल्या नाहीत, त्यानी त्या नेस्तनाबूतही केल्यात. ‘फोदयो’ ह्या कवितेतून त्यानी आपल्या कवितांची स्वताःच ओळख करून दिली आहे. होळी- शिमग्याच्या लोक गीतातूंन प्रस्थापीताना उद्देशून शिविगाळ करण्याची भारतीय समाजाची परंपरा आहे. गोवा – कोकणात ह्या लोकगीताना ज्या स्त्रीलिंगवाचक  शब्दाने ओळखले जाते त्या जातीच्याच माझ्या कविता आहेत. त्या वाचण्याचं बळ नसेल तर कुत्र्यावाणी शेपूट घालून पळत सुटा असा त्यांच्या सल्ला आहे. ‘मनात खदखदपी ज्वालामुखी, तश्योच ह्यो कविता’ असं विष्णू बीनदिक्कतपणे लिहितात.          

विष्णू खरंच बामणावर तूटुन पडलेत. शिव्याशापानी ते त्यांचे वस्त्रहरण करु पाहताहेत.गोव्याच्या स्वातंत्र्यास 50 हुन अधिक वर्षे पूर्ण झालीत.  इतक्या वर्षानंतर अशा स्वरुपाच्या लिखाणाची  खरंच गरज होती का?  मनांत खदखदणार्‍या ज्वालामुखीला वाट देण्यासाठी अश्लीलतेची कास धरण्याची खरंच गरज होती का? हा प्रश्न विचारीत असताना ‘त्या’च्यातल्या आपल्या एका मैत्रीणीबरोबर एकांतात केलेल्या श्रृंगाराच्या वेळी तीने विष्णूची  जातीवरून छेड काढली म्हणून ‘संद’ ह्या कवितेतून तिला अशी नागडी करणं योग्य होतं का? कधीकाळी शस्त्रहीन दबलेल्या बहुजनसमाजाच्या मुखातल्या जळजळीत शिव्या-गाळी हीच त्यांची शस्त्रे होती ह्यात संदेह नाही. आधूनीक काळांत शिक्षीत झालेला बहुजन समाज पोटांत बाळगलेली ही तिडीक गाळीच्या रुपाने कां व्यक्त करू पाहतोय असा प्रश्न पडणं स्वाभावीक आहे. स्वतंत्र गोमंतकात सत्ताहीन झालेल्या प्रस्थापितानी भाषेचं भूत उभं केलं. कोंकणी हीच गोंयकारांची ‘निजभास’, तीच तीची अस्मीता व खरी ओळख; मराठी ही उपरी भाषा, कोणीतरी लादलेली, अगदीच जवळची मानली तरीही ती आई नव्हे मावशीच आहे हा विचार प्रभावीत झाला. त्यांतून एक मोठं आंदोलन उभं झालं. देवनागरी लिपी असलेली कोंकणी ही राजभाषा झाली. राजभाषेची वस्त्रं तिला चढविण्यास मराठी अभिमान्यानी विरोध कधी केला नाही. फक्त मराठीलाही तोच दर्जा द्या अशी मागणी मराठीवाद्यानी केली. त्यावेळी विष्णू मराठीवादी होते. मराठीही राज्यभाषा झाली पाहीजे यासाठी आग्रही होते. मी स्वतः याच मतप्रणालीचा. परंतू त्यापुढे जाऊन भविष्यांत कोंकणीच्या नावे सवतासुभा उभा केला जाईल व त्यांत बहुजनसमाजाची व विशेषतः किरिस्तांवी कोंकाणी वाहून  जाईल अशी भीती मी व्यक्त करीत असे. राजभाषा विधेयकाला मी दोन दुरुस्त्या सुचवल्या होत्या. पहिल्या सूचनेद्वारे रोमन लिपीचाही कोंकणीसाठी स्वीकार करण्यांत यावा व प्रमाण कोंकणी निर्माण करण्यासाठी ‘कोंकणी प्रमाणीकरण आयोग’ स्थापन करावा अशा माझ्या दुरुस्ती सूचना होत्या. कोंकणी भक्तानी ह्या दोन्ही सूचना फेटाळल्या. देवनागरी कोंकणीत लिहिणार्‍या सारस्वत समाजातल्या लेखकांची कोंकणी बहुजनसमाजाच्या बोकांडी बसली. हे शल्य आज अभिजनेतराना बोचते आहे. किरीस्तावानी आपला सवतासुभा उभारलाय. विष्णूला उपरती झाली. मराठी ‘मावशी’ असल्याचा त्याना साक्षात्कार झाला आणि त्याचबरोबर बहूजनसमाजाची कोंकणी गावकुसाबाहेर फेकली गेल्याचे शल्य त्यांच्या उरी दाटले. आपल्या संग्रहास प्रस्तावनारुपी ‘म्हाजी भास’ ह्या आपल्या कवितेत ते आपली व्यथा व्यक्त करतात.

‘आसली.

म्हाज्या पूर्वजांकूय

एक भास असली’

ती भाषा प्रगत आणि पुढारलेली होती. त्या भाषेतून ते निसर्गाकडे व दैवतांकडे संवाद साधायचे अशी त्यांची भुमिका आहे. पण ह्या भाषेला लिपी नव्हती. आजची अधिकृत गणली गेलेली कोकणी भाषा

‘परशुरामावांगडा ते जे कोण

काश्मीरांतल्यान काय बंगालातल्यान येयले

तेणीं रानां बेणताना

आमची भासूय बेणली’

 (बेणली- कापली)  

परशुरामाबरोबर आलेले ‘ते’ कोण हे सांगण्याची गरज नाही. तर अशा त्या लोकानी ‘आमगेली भाषा मारून उडयली’ असे विष्णू म्हणतात. विष्णूला ही भाषा कधी कधी ऐकू येते. बोडगेश्वर मंदिरातला पुजारी किंवा घाडी त्या मृत भाषेतच गार्‍हाणं घालतो, अंगात वारं संचारल्यावर गांवातला बाबुसो त्याच भाषेत बोलतो. पण ह्या भाषेला पुस्तकांत स्थान नाही.

‘पूण तेणी तेंची भाशा बरयली

तेंची भाशा पुस्तकांनी हाडली

आनी  आमचे भाशेक

रानवटी थारायली’.

ही विष्णूंची व्यथा आहे. खोल काळजातली जखम आहे. त्याला सुड घ्यायचा आहे. म्हणून तो म्हणतो

‘हांव सल्लां आतां भायर सोद घेवपाक...’  

हा ‘सोद’ आहे की सुड आहे हे काळच ठरवणार आहे. कांहीही असो. विष्णूसमोर भाषा प्रस्थापितांचे आव्हान आहे. कोंकणीचं एक रुपडं अधिकृत भाषा म्हणून मिरवते आहे. शाळा कॉलेजापासून विद्यापीठ स्थरावर ते विराजमान झालंय. तिच्या घरी पाणी भरण्याचं काम पेडणेकराची पेडणेकरी, सुदीरांची भंडारी, नुस्तेकरांची खारवी आणि किरिस्तावांची कोंकाणी करताहेत. आपले रंग, रुप, कात, जातपात त्यानी अव्हेरली आहे. पुर्वजांचे ‘दायज’ म्हणून गळा काढताना विष्णूला आपल्याच पुर्वज्यांच्या गत पिढ्यांच्या सांस्कृतीक मढ्यात संजिवनी भरण्याचं काम करावे लागेल. विष्णू तुझ्यात ते त्राण आता नाही राहीलय. विष्णू हतबल आहे. कोंकणीच्या मूळ लढ्यात तो नव्हता. त्यावेळी मराठी त्याची ‘आई’ होती. आता कोंकणी आई झालीय आणि मराठी आईला तो मावशीची उपमा बहाल करतोय. त्यामुळेही विष्णूच्या हेतूची शंका दोन्हीकडच्या ‘वाद्या’ना सतावतेय. कोंकणी ‘मोग्यात’ (भक्तात) विष्णू फूट पाडताहेत आणि मराठीच्या दुधावर पोसलेला त्याचा पिंड दुधाशी प्रतारणा करतोय ही मराठी वाद्यांची खंत आहे.

‘त्या’ लोकांविषयी बोलताना विष्णूचा अंगार शिव्यांच्या रुपातच प्रगट व्हायलाच हवा होता का? जेव्हा हातात कोणतंच शस्त्र नव्हतं त्यावेळी बहुजनसमाजाला फुत्कारण्यासाठी ‘गाळी’ हव्या होत्या तोवर सारं ठीक होतं. ‘भीक नको कुत्रा आवर’ प्रमाणे ‘भीक नको तुझ्या शिव्या आवर’ इतपर सारं ठीक होतं. पण आज बहुजनसमाजाकडे सारस्वतां प्रमाणेच सोज्वळ शब्दांची अस्त्रे आहेत. लेखणीरुपी शस्त्रे आहेत, सरस्वतीचे वरदान आहे. शिवाय राजकीय शक्ती आहे. विष्णू तुम्ही ह्या अस्त्रांची सुदर्शनं करुं शकला असता आणि दुष्टांचं निर्दालन करून सृष्टाना अभय देऊ शकला असतां. तुमच्यात ती ताकद होती. पण गरज नसताना तुम्ही अगदी काळाच्याही मागे गेलात. तुकारामाची व्यथा हीच तुमचीही व्यथा आहे हे खरंच. त्यांच्या तोडीचे अभंग तुम्हीही लिहू शकतां. किंबहुना ज्ञानेशाच्या तोडीच्या ओव्याही तुम्ही प्रसवूं शकता ह्या माझ्या सारख्या तुमचा सुहृदाला वाटणारी आशा तुम्ही पायदळी तुडवून मोकळे झालांत. माझ्या दृष्टीने ही मोठीच शोकांतीका.

कोंकणी अकादमीने देऊ केलेला पुरस्कार कांही कोंकणी अभीमान्यांच्या दुराग्रहाला बळी पडून सरकारने रद्द केला. त्यासाठी इतरही पुरस्कार रद्द करण्याचा पळपुटेपणा सरकारने केला. पण विष्णूंच्या पुस्तकाला खरं म्हणजे पुरस्काराची गरजच नाही. त्यातल्या कांही कवितांची भाषा ही निच्छीत मराठी कोंकणी भाषेच्या संदर्भात ‘शिवराळ’ आहे, अश्लीलही आहे. परंतू सगळ्यानाच ती तशी वाटेल असं म्हणतां येणार नाही. मुळांत अश्लीलतेची व्याख्याच ठिसुळ पायावर उभी आहे. Obscenity  किवा अश्लिलतेच्या निकषावर कथा कादंबर्‍या, नाटक, सिनेमावर बंदी आणण्याचे प्रयोग कधींच सफल झाले नाहीत. सर्वौच्च न्यायालयाने अश्लीलतेवर भाष्य करताना शंभर वर्षापुर्वीच्या ‘हिकलिंग टेस्ट’ नावाने प्रचलीत असलेल्या सुत्रांचा वापर केलाय. ज्या लिखाणामुळे वाचकांच्या मनांत वैशयीक भावना उफाळून येतात व जे लिखाण प्रचलीत निती अनितीच्या तत्वाना छेद देते अशाच कलाकृती अश्लील व्याख्येत बसू शकतात. मराठी वाचकानी भाऊ पाध्ये, चंद्रकांत काकोडकर, ना.सी. फडके असो लेखक पचवले. इंग्रजी वाचण्यार्‍यानी लेडी शॅटर्लेज लव्हर, लोलिता, असल्या कादंबर्‍या पचवल्या. हल्लीच्या काळांत पाब्लो कुलासो आणि अरूंधती रॉय ह्याही त्यांच्या जीवनात डोकावून गेल्या. त्याना विष्णूंच्या शिव्या किवा लैंगीक संदर्भ आणि लिखाण हलवूं शकत नाहीत. खरं म्हणजे वात्सायनाच्या या भूमीत खजुराहो, लिंगराज आणि सुर्यमंदिराच्या सान्नीध्यांत वावरणार्‍या भारतीय समाजासमोर श्लील – अश्लीलच्या बाता कोणी ठोकूच नयेत. राहातां राहतो तो विष्णूच्या वाङमय कृतीतून दृष्टीपथास पडणारा सारस्वत समाजाबद्दल, त्यांच्या जातपिठांबद्दल आणि एकूणच त्यांच्या श्रेष्टत्वाच्या भावनेबद्दलची चीड आणि तिरस्कार. विष्णूंची ही भुमिका आजच्या पुनच्छ वेगाने वाढणार्‍या हिंदुत्वाच्या आणि वर्णश्रेष्टत्वाच्या भावनेशी पडताळून पाहण्यास काय हरकत आहे? भाजपाने शतप्रतीशत भाजपा हा आपला आजेंडा प्रत्यक्षांत उतरविण्यासाठी हिंदुत्व, जात वर्णवाद, तसंच दलीत, आणि अल्पसंख्याक यां विरुध्द कधी उघडरित्या तर कधी छुप्या रितीने आघाडी उघडलेली आहे. ह्या तत्वांचे खरे पुरस्कर्ते उच्चवर्णीय आहेत पण लढाऊफौज बहुजन समाजाची आहे. संविधानाला अभिप्रेत असणार्‍या समता, समभाव, बंधुत्व, न्याय, आदी तत्वाना ही भूमिका हरताळ फासेल अशी रास्त भीती वाटते. अशावेळी निदान सारस्वतांच्या पिठाधिशानी तरी नवी उन्मेशी, घटनेस अभिप्रेत असलेली भुमिका घ्यावी व जातपाती मधील भिंती तोडण्यास हातभार लावावा. त्याहीपुढे जाऊन हिंदुत्वाच्या भुमिकेवर एकत्र येण्यार्‍या साधुसंतानी आणि पिठाधिशानी निदान जातवर्ण नष्ट करणारे फतवे काढून समाज एकजीव का करु नये? विष्णूंची हीच अपेक्षा असावी. ‘जाती’ ह्या आपल्या कवितेत विष्णू जातींची नामावली सादर  करतात. ज्या कोणी ह्या जाती निर्माण केल्या त्याचा तथाकथीत अश्लील शब्दांत ते समाचार घेतात. त्यामागे ह्या जातीपातीच कोणीतरी नष्ट कराव्यात अशीच त्यांची भुमिका दिसते.   

‘वालोर त्या  फो ******

जेणे जाती निर्माण केल्यो

आनी मनीसपणाच्या मड्डाचेर

वंयो बांदून काढल्यो

(मड्ड – सपाट एकजीव, कोरडवाहू भूमी, वंय – कुंपण)

विष्णूला ही ‘वंय’ तोडायची आहे, माणुसपण जागवायचे आहे असंच मला वाटतं. विष्णूंच्या कविता संग्रहास पुरस्कार मिळू नये म्हणुन ज्यानी अट्टाहास केला व ज्या सरकारने हा पुरस्कार फेटाळला त्यांचा मी निषेध करतो. त्याचबरोबर विष्णूचाही निषेध करतो. ‘सरस्वतीने’ ने प्रदान केलेलं अती सुंदर शब्द भंडार असलेला हा ‘कुबेर’ बहुजन समाजाने कधीच फेकून दिलेली घाणेरडी ‘कवने’ पुन्हा पुन्हा का वापरतो? ज्या बहुजनसमाजाबद्दल तुला एव्हढी तळमळ आहे त्या समाजावरच तूं अन्याय करतो आहेत असं नाही का वाटत....? तुझ्या मावशीने, मराठीने तुला काय नाही दिलं? तिनेच तुझ्या ‘मुखात ग्यानबाल्या सांस्कृतीक दुदाची धार’ पिळली, केशवसुताची तुतारी तिनेच तुझ्या कानांत फुंकली, तिनेच वर्षाव केला तुझ्यावर ‘बालकवीच्यो आनंदझरी.’ तुझी भेट जोतीबा आणि आंवेडकरांशी करून दिली, नवी नजर दिली, नाटक दिले, भजन दिले एव्हढंच नव्हे तर तुझी भेट शिवरायांशी करूंन दिली. तुला कुठल्या ‘कर्मकट्ट्याची दिश्ट लागली’ हेंच मला कळेनासे झालेंय. तुझ्या ‘काळपटलेल्या जिणेक’ कोंकणीमुळें जर ‘चान्न्या देग दिसल्या’ तर शिव्यागाळीच्या ‘चिकोल रेब्यात’ तू कां बरे लोळतो आहेस? विष्णू शापीत गंधर्व आहे, कलंदर कवि आहे. त्याला बिलंदर म्हणून हिणवलेलं मला कसं आवडेल?   

Disclaimer: Views expressed above are the author's own.Khalapbab,

Kenna kenna GhaaN saaf kapaak tya Ghaanin utarche padtaa.

Sanghattek Sarawat samaajaan je atyaachaar bahujaan samaajaar etli varsa kele te Vishnuchya kawanaani kami jaavpaache naa.

Tujyasarke lok je chadd payshe and satta haatan yetukat 'neo saraswat' jaatat, hech tar khare bahujan samaajaache durdayv.

 
Hulap |

अप्रतीम विवेचन. लेख मनापासून आवडला व विचार पटले.

 
Alka Damle |

Blogger's Profile

 

Ramakant Khalap

Adv Ramakant Khalap is former Chairman of the Goa State Law Commission. Being a veteran politician of Goa, he has served the political arena as the union law minister as well as Goa’s deputy chief minister and the opposition leader in the past. He also takes keen interest in literature and cultural activities while heading several institutions, especially in the field of Marathi literature.

 

Previous Post

 

Archives