काणकोणला हवाय नियोजनबद्ध माणुसकीचा झरा
दुःख एकाच गोष्टीचे वाटते. हा प्रलय पाहून खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत हादरले. तीन दिवस फक्त काणकोणात तळ ठोकून बसले. लोकांना दिलासा दिला. पण तिथल्या स्थानिक राजकारण्यांनी मात्र या पूराचे केवळ राजकारण केले. आपणच रक्षणकर्ते असल्याचा आव आणीत सरकारी अधिकार्यांणच्या मदतकार्यात ढवळाढवळ केली. प्रत्यक्षात मदतकार्य सगळ्या गरजूंजवळ पोचलेच नाही.
पूर येणे, महापूर येणे आणि त्यात घरे-दारे बुडून जाणे, माणसे वाहून जाणे ही आम्हाला तशी नवीन गोष्ट नाही. वृत्तपत्रांतून आपण या गोष्टी रोजच वाचतो, टीव्हीवर पहातो आणि काही (आणि अक्षरशः काहीच) क्षण हळहळतो. मात्र मुंबईत ढगफुटी होऊन ती बुडाली तेव्हा मात्र आम्ही अस्वस्थ झालो. कारण मुंबई हा भावनिकदृष्ट्या आमच्या गोव्याचाच विस्तारित भाग बनलेला आहे. आमचाच कशाला, संपूर्ण भारताचा. पण हे प्रत्यक्ष गोव्यात होईल असे मात्र कधीच वाटले नव्हते. मला स्वतःला माझ्या काणकोणमध्ये होईल असे तर नव्हतेच वाटले.
पण ते झाले. माझे काणकोण बुडाले.
2 ऑक्टोबरचा हा दिवस मी व आमचा वृत्तसंपादक प्रमोद आचार्य कधीच विसरणार नाही. त्या दिवशी आमचा प्रुडंटचा वर्धापन दिवस होता. 4 वाजल्यापासून पाहुणे यायला लागले आणि दुसर्या बाजूने काणकोणात पावसाने मांडलेल्या थैमानाच्या बातम्याही. तोंडावर बेगडी हसू आणीत आम्ही पाहुणचार करीत होतो. आमचा माशे गाव बुडाला होता. आंगले उच्च माध्यमिक विद्यालयाची मुले व शिक्षक दोन ठिकाणी अडकून पडले होते. प्रमोदचा पर्तगाळ गाव संपूर्ण बुडाला होता तर त्याच्या घराच्या पायर्यांपर्यंत पाणी पोचले होते. त्याच मनःस्थितीत आम्ही लायव्ह डिबेटसाठी स्टेजवर चढलो. काणकोणच्या हमरस्त्यावर कुणी जाऊ नये म्हणून आवाहनही केले. डिबेटही केली. खाली उतरून परत फोनाफोनी सुरू केली तर बहुतेक सगळे मोबायल बंद. लँडलायन तर कधीच गेली होती. वीजेची तर बातच सोडा. सगळा संपर्कच तुटला होता. आम्ही तुटलेल्या तारीसारखे पणजीत लोंबकळत होतो. रात्रभर...
सकाळपर्यंत आम्ही तीन रिपोर्टर्स फील्डवर पाठवले होते. आमचा काणकोणचा रिपोर्टर प्रसाद पागी आदल्या रात्रीच गेला होता. रस्त्यावर पाणी तुडुंब भरल्याने तो घरी पोचलाच नाही. देवळातच झोपला. मुख्यमंत्री दिगंबर कामतही आदल्या दिवशीच काणकोणात पोचले होते. मला राहवले नाही. मी प्रमोदला ऑफिस सांभाळायला सांगितले तेव्हा त्याच्या आवाजातनं त्याचा रडवेला चेहरा माझ्या डोळ्यांसमोर झळकला. कारण बुडलेल्या संपूर्ण गावानं रात्र त्याच्या घरात काढली होती. पण ड्युटी फर्स्ट. मीही त्या दिवशी शक्य ते सगळं काणकोण फिरलो. येताना संध्याकाळी शेवटी माझ्या घराचीही अवस्था बघून आलो. किंदळे, भाटपाल, अर्दफोंड, खोतिगांवातील मणे, पैंगीण, माशें....
जातो तिथे एकच कहाणी. अचानक पाणी आले. वाढू लागले. म्हणता म्हणता चढू लागले. कंबरेपर्यंत पोचले. गळ्यापर्यंत पोचले. घर बुडाले. घर वाहून गेले. जमीनदोस्त झाले. सगळं काही बेचिराख करून गेले.
किंदळेची सगळी घरे तळपण नदीच्या तीरावर वसलेली. एका घरात तर आम्ही चिखलात पाय रुतवत चालत होतो. त्यांचे घर अगदी तीरावर. वरून पाण्याचा लोट आला, टीव्ही, फ्रीज, इतर सामान घेऊन पाण्याचा लोट भिंतीला धडकला, भिंत कोसळली आणि क्षणार्धात सगळा संसार नदीच्या पूरात मिसळून नाहीसासुद्धा झाला.
पर्तगाळच्या एका घरातील सरकारी नोकर आपला महिन्याचा पगार खिशात असलेली पँट भिंतीवर टांगून बसला होता. अचानक पाण्याचा लोट आला. त्याला धावत जाऊन पँट काढायलासुद्धा वेळ मिळाला नाही. आत गेला असता तर बाहेर नक्कीच आला नसता. कारण त्याच्या घराची कौले तेवढी नंतर दिसत होती. बस्स!
याच पर्तगाळमधील एक 90 वर्षांचे वृद्ध पाणी घरात घुसायला लागले म्हणून दरवाजा बंद करून बाहेर आले. एकटेच होते म्हणून चालत बाहेरच्या पिंपळाच्या पाराशी आले. पाणी आणखीनच चढायला लागले म्हणून पारावर चढले. अचानक पारावरही पाणी चढले. काय करावे कळेना एवढ्यात कंबरेच्या वर पाणी चढायला लागले. म्हणता म्हणता छातीपर्यंत पोचले. कोणी तरी प्रसंगावधान राखून पोहून त्यांच्यापर्यंत पोचला तेव्हा गळ्यापर्यंत पाणी चढले होते. त्यांच्या नऊ दशकांच्या आयुष्यात त्यांनी असा प्रलय कधीच बघितला नव्हता...
सादोळशेतील खोतावाड्यावरील एका कुटुंबात मुलांना घरात ठेवून नवरा-बायको बाहेर गेली होती. त्यांचेही घर नदीच्या काठावर वसलेले. अचानक पाणी बघून धावन जाऊन त्यांनी मुलांना बाहेर काढून डोंगरावर धाव घेतली. त्यांना तिथं ठेऊन घरातील सामान वर काढून ठेवायला म्हणून तो घरात गेला. अचानक मागे बघितलं तर पाण्याचा लोटच घरात घुसत होता. बाहेर येईपर्यंत घराच्या पावळीपर्यंत पाणी पोचलं होता. बायको वरून ओरडत होती. त्यानं धाडस केलं आणि अक्षरशः पोहत तो डोंगरमाथ्यावर आला. मागं बघितलं तर फक्त कौलं तेवढी दिसत होती...
भाटपालला एक शूर वीर भेटला. सुशांत कवळेकर. माजाळीचा. तिथे रिक्षा चालवतो. आपल्या मोटरसायकलवर बसलेला असतानाच अचानक पाण्याचा प्रचंड लोट आला आणि त्याला सरळ दुथडी भरून वाहणार्या नदीमध्येच घेऊन गेला. त्याला वाटले आपण आता मेलो. तरीही तो गांगरला नाही. त्या प्रचंड पूरातसुद्धा एकामागोमाग एक एक झाड पकडत गेला. पाच झाडे त्याच्या हातातून निसटली. शेवटी सहावे झाड हाताला लागले. त्याला पकडून राहिला. नदीतून वेगात येणारी झाडे त्याला धडका देत होती. तो हेलकावत होता. तरीही त्याने पकड ढिली होऊ दिली नाही. दुपारी 2 ते संध्याकाळी 7. पाच तास तो अक्षरशः मृत्यूशी झुंज देत होता. शेवटी पाण्याचा लोट काहीसा थंडावला. आणि त्याने कसाबसा तीर गाठला. गावात मात्र अफवा पसरली होती. सुशांत गेला...
खोतिगांवातील मणे वाड्यावरील प्रयोगशील शेतकरी चंद्रकांत देसाय भेटले. त्यांचे घर बुडाले होते. पण त्याची त्यांना चिंता नव्हती. त्यांच्या शेतातील मचाणापर्यंत पाणी वाढले होते. त्यांच्या गोठ्यातील 30 गुरे बेपत्ता होती. संपूर्ण रात्र बाहेर काढून पाणी उतरल्यावर सकाळी ते आणि बायको घरी आली तर आत दोन दिवसांचे वासरू हंबरत होते. पाण्याच्या वाढत्या पातळीबरोबर ते रात्रभर पाण्यात कसे तरंगत राहिले व मग कसे खाली आले ते त्याचे तेच जाणे. आम्ही दुपारी पोचलो तेव्हाही ते गुरांनाच शोधत होते. पाच सापडली होती. एवढ्यात आमचा व्हिडियो जर्नलिस्ट अनिल सनदीने ते पाहिले. ओहोळाच्या काठावरील एका उंच झाडावर फांदीत मान अडकून एक बैल मरून पडला होता. चंद्रकांत देसायाच्या डोळ्यांतील अश्रू त्या ओहोळात मिसळत होते. त्या अपवित्र प्रलयाला भूतदयेने पवित्र करीत...
संदीप पैंगीणकर हा सर्वांचाच आवडता. 2 ऑक्टोबरच्या सकाळपासून त्याने स्वतः स्वतःलाच ड्युटी लावून घेतलेली. रस्त्यावरील पाण्यातनं वाट काढत हाताला धरून लहान मुलांना, बायकांना व पुरुषांनासुद्धा पलिकडे नेऊन पोचवणे. असे कित्येक जीव त्याने सुखरूप घरी पोचवले. मात्र रात्री आणखी एकाला पाण्यापलिकडे पोचवताना संदीपचा पाय घसरला. तो माणूस पलिकडे पोचला. पण संदीप अलिकडे आलाच नाही. गेला. कायमचा. या जगातील माणुसकीच वाहून नेणार्या त्या प्रलयात कायमचा विलीन झाला...
अश्या एक ना अनेक, घरा-घरात एकेक कथा सापडेल अशा अंगावर शहारे आणणार्या घटना आजही काणकोणात गेल्यास ऐकायला मिळतील. दुःख एकाच गोष्टीचे वाटते. हा प्रलय पाहून खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत हादरले. तीन दिवस फक्त काणकोणात तळ ठोकून बसले. लोकांना दिलासा दिला. पण तिथल्या स्थानिक राजकारण्यांनी मात्र या पूराचे केवळ राजकारण केले. आपणच रक्षणकर्ते असल्याचा आव आणीत सरकारी अधिकार्यांच्या मदतकार्यात ढवळाढवळ केली. प्रत्यक्षात मदतकार्य सगळ्या गरजूंजवळ पोचलेच नाही.
3 ऑक्टोबरला मी फिरत होतो तेव्हा ठिकठिकाणी सरकारी अधिकारी भेटत होते. ते कुणालाच दिलासा वगैरे देत नव्हते. या उध्वस्त लोकांचा अन्न, वस्त्र, निवारा हरवलाय आणि त्यातील किमान अन्न आणि वस्त्र तरी त्यांना ताबडतोब द्यायला हवेय हेसुद्धा त्यांच्या लक्षात येत नव्हते. ते कुणाचे काय काय गेले याचाच हिशेब लिहून घेत होते. साहजिकच घरे कोसळल्याने जे बेघर होऊन वेगवेगळ्या सभागृहात राहिले होते त्यांची जेवणा-राहण्याची व्यवस्था झाली. ज्यांच्या घरात पाणी शिरून काहीच वापरण्यासारखे राहिले नव्हते त्यांची व्यवस्था गांवकर्यांनाच करावी लागली. ही मदत सगळीकडे पोचली नाही हे दुसर्या दिवशी आमच्याच प्रुडंटवरील लायव्ह कार्यक्रमात बोलताना संबंधित सरकारी अधिकार्यांनी मान्य केले.
5 ऑक्टोबरपर्यंत सर्व उणिवा भरून काढल्या जातील असे आश्र्वासन खुद्द मुख्यमंत्र्यांना शेवटी प्रुडंटवरील कार्यक्रमात बोलताना दिले. बर्याच ठिकाणी धान्य, साखर, चहा पावडर वगैरे पोचले होते. परंतु ते शिजविण्यासाठी भांडीही नव्हती आणि शेगडीही. शेवटी 5 ऑक्टोबरला शेगड्या पोचत्या झाल्या. पण केरोसिन नव्हते. तोपर्यंत सरकारी मदतीचा अंदाज स्थानिकांना आलेला होता. विरोधी पक्षवालेही येवून मदत करतानाच सरकार अकार्यक्षम कसे आहे हे सांगण्यातच जास्त धन्यता मानीत आहेत हेही त्यांच्या लक्षात आले होते. तेव्हा त्यांनीच खांदे सरसावले. काणकोण पूर मदत निधी त्यांनी स्थापन केला. पैंगीणच्या श्रद्धानंद विद्यालयात सामान जमा करण्याची व्यवस्था केली. लगेच स्टोव्हमध्ये घालण्यासाठी केरोसिनची व्यवस्था करून कार्याला सुरवात झाली.
अश्या वेळी लगेच मदतीसाठी पुढे सरसावतात त्या सेवाभावी संस्था. त्या आल्या. शक्य तेवढ्या ठिकाणी पोचल्या. सरकारी मदत अजिबात पोचली नाही असे नाही. पण जिथे मंत्रीगण पोचले त्या ठिकाणी ती त्वरित पोचली. परंतु सादोळशेतील खोतावाडा वा खोतिगांवातील दाबेलातील धनगरांजवळ पोचेपर्यंत पाचवा दिवस उजाडला होता. काही माणुसकी असलेले गोंयकार पैशांची मदत घेऊन धावत आले. स्थानिक राजकारण्यांनी ते घेऊन आपापल्या व्होट बँकेत ते वाटून टाकले. एकेका घरात कित्येक चादरी पोचल्या तर कित्येक घरात एकसुद्धा नाही. कुठे काय पाहिजे याची सविस्तर यादी अजून अधिकार्यांजवळ उपलब्ध नाही. आहे ती मदत व्यवस्थित पोचविण्याच्या यंत्रणेत स्थानिक राजकारणी ढवळाढवळ करीत आहेत. शक्य आहे तिथे काही अधिकार्यांना हाताशी धरून भलत्याच ठिकाणी मदतीचा ओघ वळविला जात आहे.
आताश्या सर्वांना कपडे-लत्ते, भांडी, स्टोव्ह, केरोसिन वगैरे बर्याच प्रमाणात पोचलेले आहते. तरीही मदतीचा अनावश्यक ओघ सुरूच आहे. कारण काय हवे आणि काय नको याचा अंदाज सरकारी पातळीवर घेतलाच जात नाहीय. त्यात सरकारी मदत आणि सेवाभावी संस्था यांचे डुप्लिकेशन होऊ नये म्हणूनही व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत केली गेलेली नाहीय. काणकोण पूर मदत निधीच्या नावे संघटित झालेले स्थानिक नागरिक तेवढे काही प्रमाणात योजनाबद्धरित्या कार्यरत असलेले दिसत आहेत. पण त्यांच्यामध्ये आणि सरकारी यंत्रणेमध्ये समन्वय जाणवत नाही. सरकारी मदत राजकारण्यांनी हायजॅक केलेली आहे असे सर्वत्र उघडपणे बोलले जात आहे.
याहून जास्त धोका पुढे संभवतोय तो आरोग्याचा. सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. यातून रोगांची साथ पसरण्याची भीती आहे. तेव्हा हा चिखल साफ करण्यासाठी आज सेवाभावी संस्थांची गरज आहे. कित्येक विहिरी दूषित झालेल्या आहेत. पण त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने साफ करण्याऐवजी - दोन फस्कां ब्लिचिंग पावडर घालात - असे सांगून विहिरी शुद्ध करण्याचा जगावेगळा प्रकार घडत आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रादुर्भावातून निर्माण होणार्या रोगांची साथ उद्या काणकोणमध्ये पसरल्यास नवल वाटू नये. शेवटी खाजगी डॉक्टरांच्या संघटनेच्या पथकाने आता काणकोणातील पूरग्रस्त भागांना गुरुवारी भेटी देऊन पाहणी केलेली आहे. डॉक्टरांची पथके महिनाभर तरी पाठवत राहण्याच्या त्यांचा इरादा आहे. आरोग्यविषयक जनजागृती करण्याचीही त्यांची योजना आहे. हे झाले नाही तर पूरातून निर्माण होणार्या वेगवेगळ्या साथी पसरू शकतात असे हेच डॉक्टर्स सांगत आहेत.
काणकोण हळूहळू पूर्वपदावर येत आहे यात शंकाच नाही. परंतु पद्धतशीर योजनेचा अभाव असलेल्या कार्यामुळे मदत कार्य असंतुलित बनले आहे. माणुसकीच्या झर्याची जागा हळूहळू राजकी स्वार्थ घेऊ लागलेला आहे. एकामेकां साह्य करू या भावनेऐवजी एकामेकां दोष देऊ हाच गजर जास्त ऐकू येतोय. सगळेच सरकारी अधिकारी वाईट नाहीत. सगळेच राजकीय पुढारीही स्वार्थी नाहीत. पण जे वाईट आहेत त्यांच्यावर वचक ठेऊन मदत कार्यास शिस्तबद्ध बनविण्याचा प्रयत्न दिसत नाही. ही शिस्तबद्धता, हे नियोजन, हा समन्वय आणि हा विश्वास याची आज काणकोणला खरीखुरी गरज आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी मानसिक बळ देणे हेही तेवढेच जरुरीचे आहे. नुसती कपड्यालत्त्यांची गरज भागवून काणकोण पूर्वपदावर येणार नाही. त्यासाठी माणुसकी हवी, प्रामाणिकपणा हवा आणि तेवढेच शिस्तबद्ध नियोजनही हवे. नाहीतर पुढच्या पंधरा दिवसात काणकोण डोमकावळ्यांचा अड्डा बनेल यात शंका नको.